आरटीओ कार्यालयाजवळील धाब्यावर अबकारी विभागाची कारवाई : बेकायदा व्यावसायिकांचे धाबे दणाणले
वार्ताहर /कोगनोळी
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी हद्दीतील आरटीओ कार्यालयाजवळील धाब्यातून विक्री होणारे सुमारे 2 लाख रुपये किंमतीचे 35 किलो अफीम (अंमली पदार्थ) गुरुवारी जप्त केले. ही संयुक्त कारवाई करताना बेळगाव व चिकोडी विभागाच्या अबकारी विभागाने संशयित धाबाचालक गिरीधरसिंग किशोरसिंग राजपुरोहित (वय 41, रा. इन्सुली, सावंतवाडी) याला अटक केली. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून राजपुरोहित यांच्याकडून अफीमची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱयांचे धाबे दणाणले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चिकोडी विभागाचे अबकारी पथक बुधवारी सायंकाळी महामार्गावर गस्त घालत असताना महामार्गाशेजारी कोगनोळी आरटीओ ऑफिस नाक्मयासमोर दोन ट्रकचालकांमध्ये वाद चालला होता. दरम्यान, यावेळी पथकातील अधिकारी व कर्मचाऱयांनी केवळ संशयावरून वाद चाललेल्या ठिकाणी बराच वेळ थांबून चाचपणी केली. यावेळी पथकाने केवळ संशयावरून जवळच असलेल्या राजस्थानी राजपुरोहित धाब्यावर वेषांतर करून टेहळणी ठेवली. यावेळी महामार्गावरून ये-जा करणारे ट्रकचालक व अन्य वाहनचालक अफीम खरेदी करीत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पथकाने धाबाचालक गिरीधरसिंग राजपुरोहित याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता गिरीधरसिंग यांनी आपण धाब्यामध्ये अफीमची विक्री करीत असल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने गिरीधरसिंग यांच्याकडून 2 पोत्यामध्ये असलेले सुमारे 2 लाख रुपये किंमतीचे 34 किलो 465 ग्रॅम अफीम जप्त केले.
याप्रसंगी अबकारी चिकोडी विभागाचे उपायुक्त जगदीश कुलकर्णी म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून धाबाचालक गिरीधरसिंग हा व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले आहे. ठराविक व नेहमीचे ग्राहक हेरुनच तो याची विक्री करीत होता. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पकडण्यात आलेल्या 35 किलो अफीमची किंमत सुमारे 10 लाख रुपये होते. दरम्यान यावेळी गिरीधरसिंग यांच्यावर अबकारी विभागाने अंमली पदार्थाविरोधी कायद्याने गुन्हा दाखल करून त्याला चिकोडी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये रवानगी केली. ही कारवाई अबकारी विभागाचे जिल्हा अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, सहाय्यक अबकारी आयुक्त फिरोजखान किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडी अबकारी विभागाचे सहाय्यक उपायुक्त अनिलकुमार नंदेश्वर, उपाधीक्षक राजू गुंडे यांच्यासह उपनिरीक्षक शिवकुमार अमिनभावी, शंकर चौगुला, हवालदार केदारी नलवडे, अर्जुन मल्लापुरे, दशरथ कुराडे, सागर बोरगावे यांनी केली.