गोवा मुख्यमंत्र्यांनी विरोधी आमदारांवर डागली तोफ : सर्वपक्षीय बैठकीस सर्व विरोधी आमदार गैरहजर,कर्नाटकातील आमदार एकसंघ असल्याचेही सुनावले
प्रतिनिधी /पणजी
विरोधक सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीला उपस्थित न राहता केवळ म्हादईवरून राजकारण करीत आहेत. विजय सरदेसाई यांना सरकारवर आरोप करण्याशिवाय काहीच काम नाही. त्यांना जर खरीच म्हादईची काळजी असती तर त्यांनी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थिती लावली असती. जरी विरोधकांनी साथ दिली नाही, तरी आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीतच राहणार आहे. म्हादई नदी ही सर्वांची असल्याने मी गोमंतकीयांच्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
म्हादईच्या विषयावरून बोलविण्यात आलेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी केंद्रीय पर्यटनराज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर व 33 आमदार उपस्थित होते. बैठकीत विरोधी पक्षांचे सर्वच्या सर्व सातही आमदार गैरहजर राहिले.
विरोधकांना काहीच काळजी नाही
केंद्राने मंजूर केलेल्या डीपीआरबाबत आपल्याला काहीच कल्पना नव्हती, तरीही विजय सरदेसाई आरोप करीत आहेत. सर्व पक्षांनी मतभेद विसरून म्हादईचा विषय सोडवण्याची आवश्यकता असतानाही गोवा फॉरवर्ड, आप, काँग्रेस, आरजीच्या आमदारांनी या बैठकीला गैरहजर राहून म्हादईबाबत त्यांना काहीच पडून गेलेले नसल्याचे दाखवून दिले असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. कळसा-भांडुरा प्रकल्पातील पाणी वळवण्यासाठी मंजूर केलेला डीपीआर मागे घ्यावा, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना भेटणार असल्याचेही ते म्हणाले.
कर्नाटकातील आमदार म्हादईवर एकसंघ
ज्या प्रमाणे कर्नाटकातील सर्वपक्षीय आमदार एकत्र येऊन म्हादईच्या मुद्यावर बोलतात त्याप्रमाणेच गोव्यातील सर्व पक्षाच्या आमदारांनी एकसंध राहून म्हादईचा लढा यशस्वी करण्याची गरज आहे. तरीही विरोधकांना याचे काहीच पडले नसल्याने ते सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत सहभागी झाले नाहीत. त्यांना केवळ म्हादईवरून लोकांना चुकीचे माहिती द्यायची आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी विरोधकांवर तोफ डागली.
कायदेशीर अभ्यास सुरू
केंद्राने कळसा-भंडुरा प्रकल्पासाठी मंजूर केलेल्या डीपीआरबाबत तांत्रिक बाबी व कायदेशीर अभ्यास सरकारकडून सुरू आहे. डीपीआर मंजूर करताना अनेक अटी घातलेल्या आहेत. तरीही विरोधकांकडून चुकीची माहिती देऊन केवळ राजकारण करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत डीपीआरविषयी चर्चा झाली नसल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.