नितीन कुंकळय़ेकर यांचे उद्गार : राज हाऊसिंग डेव्हलोपमेंटची 18 वी वर्षपूर्ती
प्रतिनिधी / फोंडा
महामार्गाचे होणारे चौपदरीकरण व गोव्यासारख्या पर्यटनीय राज्यात हॉस्पिटीलिटी या सेवा क्षेत्राला आलेली वाढती मागणी, यामुळे येत्या काही वर्षांत राज्यात घरांना प्रचंड मागणी येईल. तसेच हॉटेल्स झपाटय़ाने वाढणार आहेत. भविष्यातील या संधीसाठी सज्ज होऊन राज हाऊसिंगसारख्या गोव्यातील नामांकित व प्रस्थापित बांधकाम उद्योगांनी आता मल्टिफेसिलेटेड होण्याची गरज आहे, असे आवाहन गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे नितीन कुंकळय़ेकर यांनी केले.
फोंडा येथील राज हाऊसिंग डेव्हलोपमेंट प्रा. लि. या आस्थापनाच्या 18 व्या वर्षपूर्ती सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. येथील मॅनिनो ट्रेड सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर ऍड. प्रशांत तेंडुलकर, राज डेव्हलोपर्सचे व्यवस्थापकीय संचालक संदीप निगळय़े, संचालिका प्रतिभा संदीप निगळय़े, राज निगळय़े व प्राजक्ता निगळय़े हे उपस्थित होते.
गोव्याची सुपर डेस्टिनेशनकडे वाटचाल
राज डेव्हलोपर्स हे गोव्याच्या बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव आहे. 18 वर्षांच्या उत्तम सेवेनंतर आता त्यांनी रहिवासी व व्यावसायिक प्रकल्प उभारणीबरोबरच हॉटेल्स व इस्पितळ उभारणीसारख्या क्षेत्रात पाऊल टाकले पाहिजे. देशात सध्या साखळी उद्योगांची चलती आहे. स्थानिक उद्योजकांनी या प्रवाहात सामील होऊन आपला कार्यविस्तार जागतिकीकरणाकडे न्यावा. ज्यामुळे उद्योगात सतत नवनवीन सुधारणा होत राहतील. महामार्गाच्या विस्तारामुळे इतर मोठय़ा राज्यांबरोबरच गोव्यातही घरांना प्रचंड मागणी वाढणार आहे. येत्या तीन ते पाच वर्षात गोवा ‘सुपर डेस्टीनेशन’ बनणार असून दिल्ली व अन्य राज्यातील बांधकाम उद्योजकांचे त्याकडे लक्ष आहे. स्थानिक बांधकाम उद्योजकांनी ही संधी सोडू नये, असे कुंकळय़ेकर म्हणाले. ऍड. प्रशांत तेंडुलकर यांनी बांधकाम क्षेत्रात 18 वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल निगळय़े कुटुंबीय व त्यांच्या आस्थापनाला शुभेच्छा दिल्या. अठरा वर्षे हा महत्त्वाचा टप्प असून आता स्वतंत्र निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी नमूद केले.
प्रसिद्धीपेक्षा परफॉर्मन्सवर अधिक भर : संदीप निगळय़े
आपल्या प्रास्ताविक भाषणात संदीप निगळय़े यांनी गेल्या 18 वर्षांच्या व्यावसायिक क्षेत्रातील अनुभव सांगितले. बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवताना अपयशाची भिती बाळगली नाही, त्यामुळेच जिद्दीने पुढे जाण्याचा मार्ग सापडला. या यशाच्या प्रवासात सर्व कर्मचारी, कुटुंब सदस्य व असंख्य ग्राहकांचा मोलाचा वाटा आहे. आमची प्रसिद्धीपेक्षा परफॉमन्सवर अधिक धारणा आहे. राज फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण व आरोग्य क्षेत्रातही आमचे काम सुरु असून समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण व आरोग्य सेवेसाठी सतत मदत करणे हे आमचे ध्येय आहे, असेही त्यांनी सांगितले. आस्थापनामध्ये दहा वर्षांहून अधिक काळ काम करणाऱया वीस कर्मचाऱयांना यावेळी मान्यवरांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले.
प्रतिभा निगळय़े यांनी स्वागत केले. राज व प्राजक्ता यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समरेश वायंगणकर यांनी तर अनुप देसाई यांनी आभार मानले.