ममता बॅनर्जी यांचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार ः अन्य पक्षांचा मात्र विरोध
वृत्तसंस्था/ कोलकाता
राष्ट्रपती निवडणुकीची औपचारिक घोषणा झाली आहे. राष्ट्रपतिपदासाठी संयुक्त उमेदवार उतरविण्यापूर्वीच विरोधी पक्षांच्या गटात फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची 15 जून रोजी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत ममतांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह 22 विरोधी पक्षांना निमंत्रित केले आहे. परंतु आम आदमी पक्ष, द्रमुक आणि डावे पक्ष या बैठकीपासून दूर राहणार आहेत. ममता बॅनर्जी या यशवंत सिन्हा यांना राष्टपतिपदाचे उमेदवार करण्याच्या प्रयत्नात असल्याने हे पक्ष अंतर राखत असल्याचे बोलले जात आहे.
द्रमुक आणि डाव्या पक्षांनी ममता बॅनर्जी यांच्याकडून आयोजित होणाऱया बैठकीच्या विरोधात भूमिका मांडली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आता काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क साधून तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याची आपली कुठलीच योजना नसल्याचा दावा आता तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेसच्या वतीने या बैठकीत जयराम रमेश सामील होणार असल्याचे समजते. ममतांनी या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अन् खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली आहे.
भाजपविरोधी गटातील नाराजीचे कारण आता स्पष्ट झाले आहे. तृणमूल काँग्रेस माजी केंद्रीयमंत्री आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतिपदासाठी विरोक्षी पक्षांचा संयुक्त उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे करू पाहत आहे. यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीवर विरोधी पक्ष एकजूट होऊ शकत नाही. तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि प्रगतिशील चेहरा म्हणून त्यांचे नाव मान्य होण्याची शक्यता नसेल.
विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून नाव समोर येत आहे. परंतु स्वतः पवार यांनी आपण राष्ट्रपतिपदासाठी इच्छुक नसल्याचे म्हटले आहे. दिल्ली येथे पवार यांची माकपचे महासचिव सीताराम येच्युरी यांच्याशी चर्चा होणार आहे. पवार यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याच्या दृष्टीने आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भूमिका मांडली होती. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच राष्ट्रपती निवडणुकीसाठी पवार यांचे नाव सुचविले असल्याचे बोलले जात आहे.
आम आदमी पक्ष, द्रमुक, तृणमूल काँग्रेससह शिवसेनेनेही पवार यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी स्वतःची सहमती दर्शविली होती. आप नेते संजय सिंह यांच्यासह काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पवार यांची भेट घेतली होती. विरोधी पक्षांनी संयुक्त उमेदवार उभा केला तरीही भाजपसमोर त्याचा टिकाव लागणे अवघड आहे. भाजपला राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 10 हजार मते कमी पडत असली तरीही त्या पक्षाचे राजकीय व्यवस्थापन पाहता ते ही कमी भरून काढण्याची शक्यता आहे.