नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांची असहमती : नव्याने निविदा प्रक्रियेसाठी बैठक न बोलावल्याने संताप
प्रतिनिधी /मडगाव
घरोघरी कचरा गोळा करणाऱया कंत्राटदाराला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास मी पूर्णपणे असहमत आहे. दहा दिवस किंवा पंधरा दिवसांची मुदतवाढ असू शकते, परंतु तीन महिन्यांची नाही, असे माजी नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांनी सांगितले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया टाळून अशी मुदतवाढ वरचेवर दिली जात असल्याने निवडून आलेल्या मंडळाला टीकेला सामोरे जावे लागते याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. नवे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी पदभार स्वीकारून एक महिना पूर्ण होत असतानाही नव्याने निविदा प्रक्रियेबाबत निर्णय घेण्यासाठी पालिकेची कोणतीही बैठक बोलाविण्यात आलेली नाही याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दोन कंत्राटदारांना घरोघरी जाऊन कचरा संकलनासाठी पालिकेकडून 1 नोव्हेंबरपासून तिसरी मुदतवाढ दिली गेली आहे. यासंदर्भात नगरसेवक शिरोडकर यांनी वरील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापूर्वी तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतर मागील तीन महिन्यांत पालिका प्रशासन नेमके काय करत होते ते पाहण्याची गरज आहे. कारण या कामासाठी नवीन कंत्राटदार नेमण्यासाठी ते निविदा प्रक्रिया का पूर्ण करू शकले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. घनश्याम शिरोडकर हे आठवडाभरासाठी नगराध्यक्ष असताना त्यांनी या घरोघरी कचरा संकलन कराराशी संबंधित फाइलवर आपली टिप्पणी केली होती. त्यात यापुढे कंत्राटदारांना कोणतीही मुदतवाढ देऊ नये, करदात्यांचा पैसा विवेकबुद्धीने खर्च केला पाहिजे, असा शेरा त्यांनी टाकला होता.
दरम्यान, स्थायी समिती आणि अन्य उपसमित्यांच्या निवडणुकीच्या संदर्भात गोवा नगरपालिका कायद्यात सुधारणा करण्याची मागणीही नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी सरकारकडे केली असून मतमोजणीची क्लिष्ट प्रक्रिया आणि नियम संपुष्टात आणावेत, असे त्यांनी सूचित केले आहे. जर नेते आणि आमदार नगराध्यक्षांच्या निवडीपूर्वी अध्यादेश आणू शकतात, तर मला खात्री आहे की, सरकार आवश्यक त्या दुरुस्त्या सहज करू शकेल, असे ते पुढे म्हणाले.