Tarun Bharat

विरोधकांची दाणादाण, भाजपची जोरदार मुसंडी

Advertisements

राज्यातील 186 पैकी 150 ग्राम पंचायती भाजपच्या ताब्यात : मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचा दावा

  • अनेक ठिकाणी अनपेक्षित, धक्कादायक निकाल
  • बहुतांश प्रस्तापित उमेदवारांना चारली धूळ
  • अनेक ‘फॅमिलीराज’वाल्यांना बसविले घरी

प्रतिनिधी /पणजी

राज्यातील 186 ग्रामपंचायतींच्या 10 ऑगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीचे निकाल शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झाले असून 186 पैकी जवळपास 150 पंचायतींवर सत्ताधारी भाजपने आपला झेंडा फडकाविला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सायंकाळी या संदर्भातील घोषणा केली. विरोधकांनी या निवडणुका फार गांभीर्याने घेतल्या नसल्याने आणि सत्ताधारी भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिस्तबद्धरित्या प्रचार करून बहुतांश पंचायतीवर कब्जा मिळविला. जनतेने अनेक प्रस्तापितांना धूळ चारीत युवाशक्तीला मदतीचा हात दिला. कळंगूटमध्ये मायकल लोबो यांच्या पॅनलला जोरदार धक्का दिला. भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांचा पराभव, सदानंद शेट तानावडे यांच्या भावाचा विजय, सभापती रमेश तवडकर यांची पत्नी सौ. सविता तवडकर यांचा विजय, चर्चिल आलेमाव यांची कन्या शॅरन डिकॉस्टा यांचा विजय तसेच माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांची कन्या सुहिरा हिचा पराभव झालेला आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारानी आपल्या बहुतांश पंचांसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तीनो येथे बंगल्यावर जाऊन भेट घेतली आणि त्यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त केला.

 पंचायत निवडणूक निकालातून ग्रामीण भागातील जनतेने बऱयाच प्रमाणात बदलासाठी मतदान केल्याचे समोर आले आहे. राज्यातील तालुका मुख्यालय व इतर ठिकाणी असलेल्या एकूण 21 मतमोजणी केंद्रातून काल शुक्रवारी सकाळी 8 वा. मतमोजणीचे काम सुरु करण्यात आले. अनेक वॉर्डातून दोन ते तीन उमेदवारांमध्ये अटीतटीच्या लढती झाल्याचे दिसून आले. काही उमेदवार एक-दोन-तीन मतांनी विजयी झाले तर अनेक उमेदवार तेवढी मते कमी पडल्याने पराभूत झाल्याचे निकालातील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी भाजपला व त्यांच्या काही आमदारांना अनेक ठिकाणी धक्का देणारे निकाल लागले असून संपूर्ण संपूर्ण पॅनल निवडून आणण्यास अपयश आले आहे.

मायकल लोबो, जोसेफ सिक्वेरा आले एकत्र

दरम्यान एका अनपेक्षित घटनेतून विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी कळंगूट पचायत क्षेत्रात त्यांच्या पॅनलच्या झालेल्या पराभवानंतर आणि माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांच्या पॅनलचे केवळ तीन उमेदवार निवडून आल्यानंतर लोबो यांनी जोसेफ यांना आपला पाठिंबा जाहीर केला. गेली पाच वर्षे एकमेकांचे तोंड न पहाणारे जोसेफ सिक्वेरा आणि मायकल लोबो हे एकत्र आले. या 11 सदस्यीय पंचायतीवर 5 अपक्ष विजयी झाले आहेत. लोबो यांनी आपल्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले.

 मायकल, विश्वजित, रोहनना जारेदार धक्के

आमदार मायकल लोबो यांना कळंगूटमध्ये धक्कादायक निकाल अनुभवावे लागले असून त्यांच्या गटाचे केवळ 3 उमेदवार विजयी ठरले तर जोसेफ सिक्वेरा गटाचे 6 उमेदवार जिंकून आले आहेत. लोबो यांचा मुलगा डॅनियल लोबो हा मात्र पर्रा पंचायतीमधून निवडून आला आहे. मंत्री रोहन खंवटे व मंत्री विश्वजित राणे यांनाही त्यांच्या गटातील सर्व उमेदवारांना मतदारसंघातील पंचायत निवडणुकीत जिंकून आणणे शक्य झाले नसल्याचे निकालातून दिसते. उसगाव पंचायतीत विश्वजित राणे यांचे बहुतेक समर्थक उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. मेळावलीतील जनतेने राणे यांच्या उमेदवाराचा पंचायत निवडणुकीत पराभव केला आहे.

अनेक प्रस्तापितांच्या पदरी पराभव

माजी मंत्री मिकी पाशेको यांची पत्नी व्हायोला पाशेको बेताळभाटी पंचायतीमधून विजयी झाल्या असून सहावेळा निवडून आलेले चिंबलचे माजी सरपंच चंद्रकांत कुंकळ्ळकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. चारवेळा सरपंच झालेल्या मार्था साल्ढाणा यांना कांसावली पंचायतीमधून पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. बोगमाळो पंचायतीत 7 पैकी 5 उमेदवार भाजपप्रणित निवडून आले आहेत. अनेक ठिकाणी अनेकवेळा पंच, सरपंच राहिलेल्या उमेदवारांच्या पदरी पराभव आला.

प्रियोळात गोविंद गावडेंना दिलासा

फोंडा तालुक्यात एका पंचायतीत डॉ. केतन भाटीकर यांच्या गटाला पराभवाचा धक्का बसला असून 11 वॉर्डातून केवळ 4 जागा त्यांच्या वाटय़ाला आल्या आहेत. तर 7 जागा भाजपप्रणित उमेदवारांनी मिळवल्या आहेत. वेलिंग-प्रियोळ पंचायतीत मंत्री गोविंद गावडे यांच्या गटाने 11 पैकी 9 जागा मिळविल्याची माहिती समोर आली आहे. पेन्ह-द-फ्रान्स पंचायतीत मंत्री रोहन खंवटे यांच्या गटाचे 11 पैकी 9 उमेदवार जिंकले आहेत. नावेली पंचायतीत भाजपला मोठा धक्का बसला असून 9 पैकी 2 जागावरच विजय प्राप्त झाला आहे. तेथील भाजपचे आमदार उल्हास तुयेकर यांचे आसन त्यामुळे डळमळीत झाल्याचे दिसून येते. भाजपचे प्रवक्ते इरफान मुल्ला यांना पंचायत निवडणुकीत पराभवाचा झटका बसला आहे.

गुदिन्हो, ढवळीकरांना थोडासा दिलास

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी चिखली व चिकोळणा या आपल्या मतदारसंघातील पंचायतीत निम्या उमेदवारांना निवडून आणले आहे. सभापती रमेश तवडकर यांची पत्नी सविता तवडकर या पैंगीण पंचायतीमधून विजयी झाल्या आहेत तर मडकई पंचायतीत मगोपच्या गटाला 9 पैकी 4 जागा मिळाल्याने सुदिन ढवळीकरांना थोडासा धक्का बसला आहे.

Related Stories

प्रत्येक पिढीला चित्रपट प्रेरणा देतात

Amit Kulkarni

मडगाव नगरपालिकेची इमारत संवर्धन विभागात येते की नाही ?

Patil_p

सत्तरी तालुक्मयात पोझीटिव्ह रुग्णाची संख्या 14 झाल्याने भयग्रस्त वातावरण

Patil_p

म्हादईसाठी 26 रोजी खांडेपार येथे कलश मिरवणूक

Patil_p

केरी सातेरी केळबाई आजोबा देवस्थान.

Patil_p

दिल्लीच्या सरकारी कार्यालयांमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लागणार

Sumit Tambekar
error: Content is protected !!