प्रतिनिधी /पणजी
मराठीदेशा फाऊंडेशन प्रकाशित इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे यांच्या सहा ऐतिहासिक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा सोमवार 6 जून रोजी इन्स्टिटय़ूट मिनेझीस ब्रागांझा, पणजी येथे सायंकाळी 4 वा. पार पडणार आहे. ग्रंथ प्रकाशनाचा सोहळा इन्स्टिटय़ूट मिनेझीस ब्रागांझा आणि मराठीदेशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी किल्ले रायगड येथे झाला होता. या घटनेस यावर्षी 349 वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळय़ाचे औचित्य साधून सदर ग्रंथ प्रकाशनाचा सोहळा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सर यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमास इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे यांच्या नात सौ. साधना बेंद्रे (अमेरिका), अमरदादा जाधवराव (अध्यक्ष, छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट महाराष्ट्र), इन्स्टिटय़ूट मिनेझीस ब्रागांझाचे चेअरमन दशरथ परब, व्हाईस चेअरमन गोरख मांद्रेकर, सेक्रेटरी अशोक परब तसेच मराठीदेशाचे एक्स्कि्युटिव्ह प्रेसिडेंट डॉ. दामोदर मगदूम नाईक उपस्थित राहणार आहेत.
गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी सहा ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. ग्रंथ प्रकाशनाच्या या सोहळय़ात खालील ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे.
‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’, ‘छत्रपती शिवाजी महाराज (पूर्वार्ध व उत्तरार्ध)’, ‘छत्रपती संभाजी महाराज’, ‘छत्रपती राजाराम महाराज’, ‘राज्याभिषेकप्रयोग’ हे ग्रंथ मराठीदेशा फाउंडेशनतर्फे प्रकाशित होणार आहेत. प्रकाशित होणारी सहा पुस्तके पूर्णपणे नव्या रुपात, काही मूळ पत्रांसहित (मूळ मोडी पत्रांची छायाचित्रे आणि मराठी लिप्यंतरासहित) आणि क्राऊन (मोठय़ा) साईजमध्ये प्रकाशित होत आहेत. या सहा पुस्तकांपैकी एक असलेले ‘छत्रपती राजाराम महाराज’ हे दुर्मिळ पुस्तक जवळजवळ 50 वर्षांनी पुन्हा एकदा प्रकाशित होत आहेत.
या ग्रंथांच्या मुखपृष्ठांसाठी शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांची अभ्यासून नवी तैलचित्रे बनवण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवरील ग्रंथात वा. सी. बेंद्रे यांनी शोधलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे ब्लॅक अँड व्हाईट स्केच मराठीदेशातर्फे रंगीत स्वरुपात नव्याने प्रकाशित केले जाईल. सन 1938 मध्ये मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉन यांच्या इच्छेवरून वा. सी. बेंद्रे यांना सरकारी ‘हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर’ म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला पाठवले गेले. दोन वर्षांत संशोधनात तयांनी मराठय़ांच्या विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहास विषयक साधनांचे संशोधन व त्याकरिता इंडिया हाऊस व ब्रिटीश म्युझियममधील ऐतिहासिक साधनांचे सुमारे 25 खंड होतील एवढी सामग्री भारत परत आणली. या काळात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मुळ चित्र शोधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीवेळी हे चित्र एका डच चित्रकाराने तत्कालीन गव्हर्नर व्हॅलेन्टाईन यांच्या सांगण्यावरून काढलेले होते. या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची बरीच चित्र प्रसारात आली होती. ज्यास कोणताही संदर्भ नव्हता. इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे मुळ चित्र सर्वांना उपलब्ध झाले आहे. आज या छायाचित्राला राजमान्यता मिळाली आहे. मराठीदेशा फाउंडेशनने मुळ कृष्णधवल स्वरुपात असलेले हे चित्र डिजिटल टूल्सचा वापर करून अगदी हुबेहुब जिवंत चित्र बनवले आहे. हेच चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या ग्रंथाचे मुखपृष्ठ आहे. तसेच छत्रपती राजाराम महाराज यांच्या तरुण वयातलं, जिंजी किल्ल्याच्या पार्श्वभूमीवरील अतिशय देखणे असे पहिलेच चित्र ‘छत्रपती राजाराम महाराज’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ आहे.
चाळीस वर्षांच्या संशोधनानंतर सन 1960 साली छत्रपती संभाजी महाराजांचे खरे चरित्र वा. सी. बेंद्रे यांनी सर्वांसमोर प्रसिद्ध केले होते. या ग्रंथाने समाजात महाराष्ट्र इतिहास संशोधन क्षेत्रात वा. सी. बेंद्रे यांचे नाव छत्रपती संभाजी महाराजांवरील त्यांचे प्रदीर्घ संशोधन व संभाजी महाराजांची पारंपरिक प्रतिमा बदलून नवी प्रतिमा उभे करणारे म्हणून प्रसिद्ध आहे. या चरित्रामुळे स्वाभिमानी, धर्मनिष्ठ, पराक्रमी, संस्कृत जाणकार अशा छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचे सर्व गैरसमज दूर झाले. या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांवरील ग्रंथ नव्या रुपात प्रकाशित केला जाणार आहे. युद्धसन्मुख राजा असा ज्या छत्रपती संभाजी राजांचा गुणगौरव केला गेला आहे त्यांचे तेंगणापट्टणम तामिळनाडू येथील युद्धातले अतिशय भारदस्त चित्र छत्रपती संभाजी महाराज या ग्रंथाचे मुखपृष्ठ आहे. वा. सी. बेंद्रे यांचे ग्रंथ प्रकाशनानंतर कार्यक्रमस्थळी सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. अधिक माहितीसाठी डॉ. दामोदर मगदूम नाईक (9421051889) व अशोक परब (9960283690) यांच्याशी संपर्क साधावा.