संजय भंडारी याच्यासंबंधी ब्रिटनच्या न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कुप्रसिद्ध शस्त्रव्यापारी आणि दलाल संजय भंडारी याला भारताकडे सोपविण्याचा आदेश ब्रिटनच्या कनिष्ठ न्यायालयाने दिला आहे. शस्त्रव्यवहारांमध्ये करचुकवेगिरी करणे आणि लाच देणे असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. त्याचे प्रत्यार्पण करावे अशी मागणी भारताने ब्रिटनकडे केली होती. न्यायालयाचा निर्णय आता ब्रिटनच्या गृह विभागाकडे पाठविण्यात येईल. प्रत्यार्पणावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार तेथील गृहमंत्र्यांचा आहे. त्यांनी निर्णय घेतल्यास प्रत्यार्पण करण्यात येईल.
1 जुलै 2015 ते 7 फेब्रुवारी 2017 या कालावधीत संजय भंडारी याने दोन प्राप्तिकर विवरणपत्रे सादर केली होती. मात्र, ती अपुरी होती. या विवरणपत्रांमध्ये त्याच्या विदेशातील मालमत्तांचा आणि उत्पन्नांचा उल्लेख नव्हता. या मालमत्तांवर आणि उत्पन्नावर त्याला भारतातच करभरणा करावा लागणार होता. तथापि, हा कर चुकविण्यासाठी त्याने खोटी विवरणपत्रे सादर केल्याचा आरोप आहे.
लाचेचे वितरण
संजय भंडारी हा काही शस्त्र कंपन्यांचा मध्यस्थ म्हणून काम करीत होता. या कंपन्यांची शस्त्रे भारताने विकत घ्यावीत, यासाठी त्याने काही भारतीय अधिकारी आणि उच्चपदस्थांना लाच दिली होती, असाही आरोप त्याच्यावर आहे. पॅलाटस व्यवहार प्रकरणात त्याने भारतीय वायुदलाच्या अधिकाऱयांना लाच दिल्याचा आरोप आहे. पॅलाटस एअरक्राफ्ट लिमिटेड या कंपनीकडून भारतीय वायुदलाने 75 प्रशिक्षण विमाने खरेदी करण्याचा व्यवहार ठरविला होता. हे कंत्राट मिळविण्यासाठी या कंपनीने भंडारी याच्या माध्यमातून दलालीच्या रकमेचे वाटप केले होते. हे कंत्राट 2,895 कोटी रुपयांचे होते. दलालीची रक्कम ऑफसेट इंडिया सोल्युशन्स एफझेडसी या दुबई येथील कंपनीच्या खात्यात 2013 मध्ये जमा झाली होती.
भारतातून पलायन
संजय भंडारी याने लुकआऊट नोटीस असतानाही भारतातून 2016 मध्ये पलायन केले होते. अधिकारिक गुप्तता कायद्यांतर्गत ऑक्टोबर 2016 मध्ये त्याच्या विरोधात प्रकरण सादर करण्यात आले होते. त्याच्या घरावर टाकलेल्या धाडीत तत्कालीन सरकारची काही गुप्त कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. ही कागदपत्रे संरक्षण विभागाशी संबंधित होती. त्याला 15 जुलै 2020 या दिवशी लंडन येथे प्रत्यार्पण वॉरंटअंतर्गत ब्रिटीश पोलिसांनी अटक केली होती.