Tarun Bharat

नगराध्यक्ष निवडीवेळी गुप्त मतदान टाळण्यासाठी अध्यादेशाचा डाव

Advertisements

गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा आरोप भाजपकडून सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी/ मडगाव

दसऱयाच्या पूर्वसंध्येला दुष्टपणा डोके वर काढत असून गोमंतकीयांनी तो उद्ध्वस्त करण्याची तयारी ठेवली पाहिजे. मडगाव पालिका नगराध्यक्षांच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा कायदा मोडीत काढण्याच्या दृष्टीने अध्यादेश काढण्याचा आणि त्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्याचा प्रयत्न चालला आहे. भाजपाला गोमंतकीयांच्या इच्छेविरुद्ध सत्ता हिसकावून घेता यावी हा त्यामागील हेतू आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.

मडगाव पालिकेत सध्या भाजपकडे 15 सदस्य आहेत. मूळ भाजपाचे 8 तसेच काँग्रेसमधून दिगंबर कामत यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटाचे 7 मिळून हा 15 सदस्यांचा गट बनला आहे. तरीदेखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुप्त मतदान झाले असता भाजपाच्या दामोदर शिरोडकर या उमेदवाराचा गोवा फॉरवर्डचे समर्थन लाभलेले स्वतंत्र उमेदवार घनश्याम शिरोडकर यांनी 15 विरूद्ध 10 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर लगेच अविश्वास ठराव आणून घनश्याम यांची भाजपाने उचलबांगडी केली होती.

वरील अविश्वास ठरावावर हात उंचावून मतदान घेण्यात आले होते. आता नियमानुसार नगराध्यक्ष निवडीवेळी गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने पुन्हा क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकदा तोंडघशी पडलेल्या भाजप सरकारने नियमात बदल करून गुप्त पद्धतीने मतदान घेण्याऐवजी हात उंचावून मतदान घेता यावे यासाठी हा खटाटोप चालविल्याने सरदेसाई यांनी वरीलप्रमाणे टीका केली आहे.

निर्वाचन अधिकाऱयांना हाताशी धरून नगराध्यक्ष निवडीवेळी हात उंचावून मतदान घेण्याची शक्यता असल्याने नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सरकारी वकिलांनी नियमानुसार गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता सदर नियम बदलण्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार असल्याचा दावा होत आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर तो कायदा बनणार आहे. त्यामुळे हात उंचावून मतदान घेणे नियमास धरून होईल. क्रॉस व्होटिंग होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते. मात्र यातून मतदानाची गुप्तता राहणार नसल्याने त्यास विरोधकांकडून आक्षेप घेण्यात येत आहे.

Related Stories

पाच पालिकांचा आज निकाल

Amit Kulkarni

भारताच्या खऱया इतिहासाला अभ्यासक्रमात स्थान द्या

Patil_p

माध्यमांनी विश्वासार्हता जपावी

Amit Kulkarni

पर्वरीत 9 रोजी विधिकार दिन

Omkar B

फोंडय़ातील (एअरपोर्ट रोड) अप्रोच रोडचे होणार ‘श्री अरबिंदो मार्ग’नामकरण

Amit Kulkarni

स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देणार

Omkar B
error: Content is protected !!