19 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य राहणार खुले
प्रतिनिधी /बेळगाव
शहर व ग्रामीण भागातील गृहोद्योग करणाऱया महिलांना व्यासपीठ देण्याच्या हेतूने देशपांडे स्टार्टअप्सवतीने महावीर भवन येथे महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन भरले आहे. दि. 16 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी जगदीश जिनगी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी के. के. भारद्वाज, गीता सुतार, सचिन कुलगोड, रमेश, वीरय्या हिरेमठ, परमेश्वर हेगडे, बाबू होनुले आदी उपस्थित होते. प्रदर्शनामध्ये एकूण 30 स्टॉल्स असून त्यामध्ये वस्त्रप्रावरणे, खाद्यपदार्थ, कृत्रिम दागिने, सेंद्रिय उत्पादने, वाळवणाचे पदार्थ, मातीची भांडी यासह अनेक वस्तू उपलब्ध आहेत. डॉ. जगदीश यांनी प्रदर्शनाच्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन उत्पादनांची माहिती घेतली. प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. चिकालगुड्ड येथील महिलांनी कर्नाटकी कशीद्याच्या रजया, गोधडी व दुपटी प्रदर्शनात मांडल्या आहेत. सदर प्रदर्शन दि. 19 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.