बेळगाव : बेळगाव सुपरबीइंग स्पोर्ट्स अकादमी यांच्यातर्फे १२ फेब्रुवारी रोजी बेळगावात सुपर बीइंग २०२३ ट्रायथलॉन आणि डुएथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, केरळ, गुजरात, बेळगावसह देशविदेशातून स्पर्धक सहभागी होत आहेत, अशी माहिती आयोजक डॉ. किरण खोत यांनी दिली.
स्पर्धेसाठी ट्रुथ प्लो एजुकेशन ट्रस्ट, बेळगाव पेडलर्स क्लब, बेळगाव अक्वाटिक क्लब आणि आजरेकर फौंडेशन यांचे सहकार्य असणार आहे. बेळगावमध्ये मागील वर्षीही स्पर्धा भरविण्यात आली होती, यावर्षी स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती.
स्पर्धा दोन टप्प्यात होणार असून यात धावणे, सायकलिंग आणि जलतरण या प्रकारांचा समावेश आहे. बेळगावच्या किल्ला तलावाचा वापर जलतरण स्पर्धेसाठी केला जातो. तर तलावाच्या बाजूला राष्ट्रीय महामार्गावर धावणे व सायकलींग स्पर्धा होतील.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी १ फेब्रुवारीपर्यंत नावे नोंद करावीत. तसेच अधिक माहितीसाठी ९९८००८०४२० या क्रमांकावर साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे व आकर्षक भेटवस्तू देण्यात येतील, असे खोत यांनी सांगितले.
यावेळी स्पर्धेचे आयोजक आस्कीन आजरेकर, साई जाधव उपस्थित होते.