अंगडी – माजाळी येथून मशाल मिरवणूक, पोळे चेकनाक्यावर होणार भव्य स्वागत, विविध कार्यक्रमांत 2 हजार विद्यार्थी सहभागी होणार
प्रतिनिधी / काणकोण
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव काणकोण तालुक्यात तिरंगा महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून यानिमित्त तालुक्यातील प्रत्येक घर, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, ग्रामपंचायती आणि पालिका कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. तसेच 13 रोजी काणकोणात सहा विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च शिक्षण संचालनालय व शिक्षणखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांचे काणकोणातील कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय, देळे येथील श्री मल्लिकार्जुन श्री. चेतन मंजू देसाई महाविद्यालय यांनी या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे.
या तालुक्यातींल सर्व शैक्षणिक संस्थांबरोबरच त्यातील 2000 विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी रूबी रेसिडेन्सीमधील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत, हेमंत अय्या, रामदास सावंत, प्रमोद गावकर, प्रेमजित वेळीप उपस्थित होते. काणकोणातील सर्व अंगणवाडय़ा, पंचायती व पालिका यात सहभागी होणार आहे.
अंगडी, माजाळी येथे कार्यक्रम
13 रोजी सकाळी 8 वा. दोन कार्यक्रम होणार आहेत. पहिला कार्यक्रम अंगडी, माजाळी येथील ज्या ठिकाणी आझाद गोमंतक दल आणि नॅशनल काँग्रेस, गोवाची छावणी होती त्या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी श्री मल्लिकार्जुन महाविद्यालय, लोलये येथील श्री दामोदर विद्यालय, माशे येथील श्री निराकार विद्यालय, सेंट सॅबेस्त्यांव हायस्कूलमधील प्रत्येकी 10 विद्यार्थी सहभागी होणार असून पत्रकार संदेश प्रभुदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे हेमंत अय्या, प्रेमजित वेळीप, राहुल देसाई त्याचप्रमाणे दामोदर विद्यालयाचे शिक्षक अनिल कामत संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
दुसऱया कार्यक्रमात पाळोळे येथील स्व. डॉ. पुंडलिक गायतोंडे यांच्या निवासस्थानाजवळून मशाल मिरवणूक काढण्यात येणार असून श्री मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विहार देसाई प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत. या कार्यक्रमात चार रस्ता येथील श्री मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक विद्यालय आणि चावडीवरील सेंट तेरेझा विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याची जबाबदारी श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाच्या डॉमिटेल डिसोझा, आनंद वेळीप, प्रद्युम्न भैरेली व श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे शिक्षक भानुदास ना. गावकर सांभाळणार आहेत.
पोळे चेकनाक्यावर स्वागत कार्यक्रम
अंगडी येथून काढण्यात आलेल्या मशाल मिरवणुकीचे पोळे चेकनाक्यावर सकाळी 9 वा. सभापती रमेश तवडकर स्वागत करतील. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गंगाधर लोलयेकर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून या ठिकाणी पथनाटय़ त्याचप्रमाणे तिरंग्यासाठी धावा ही शर्यत होईल. श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाचे सावियो लैतांव, मयूर ना. गावकर, केतन ना. गावकर, पंकज गावकर, उल्का कालेकर, अनीषा सावंत देसाई, दीपक बोवालकर, दामोदर विद्यालयाचे पुरुषोत्तम लोलयेकर आणि सत्यवती सोयरू आंगले उच्च मा. विद्यालयाचे सुधीर केसरकर या कार्यक्रमाचे संयोजक असतील.
सकाळी 9.30 वा. चावडीवरील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर चावडी ते प्रशासकीय इमारतीपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, नगराध्यक्ष सायमन रिबेलो आणि कमलाकर म्हाळशी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमात बलराम उच्च माध्यमिक विद्यालय, बलराम निवासी शाळा, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, सेंट ऍन्स इन्स्टिटय़ूट आगोंद, सरकारी माध्यमिक शाळा खोल, श्रीस्थळ, कात्यायणी बाणेश्वर विद्यालय आणि सेंट तेरेझा विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मल्लिकार्जुन महाविद्यालयाचे केवल नाईक, आनंद वेळीप, दिव्या सावंत, प्रेमानंद पागी, प्रलेश गावकर, सुदेश नाईक व अशोक गावकर संयोजक म्हणून काम पाहतील. सकाळी 10 वा. माशे येथील हुतात्मा स्मारकाजवळ मशाल मिरवणुकीचे स्वागत झाल्यानंतर माशे येथील श्री निराकार सभागृहात देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा होणार आहे. श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे विविध पावस्कर, संदेश सावंत, प्रज्योत पागी त्याचप्रमाणे श्री निराकार विद्यालयाचे शिक्षक नीलेश प्रभुदेसाई हे संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. 10.30 वा. समारोप सोहळा पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयाजवळ होणार असून तेरेखोल वीर ख्रि. आल्पेड आफोंस यांच्या पैंगीण येथील हुतात्मा स्मारकाजवळ मशाल पेटविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सभापती रमेश तवडकर, प्राचार्य डॉ. मनोज कामत, उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, पत्रकार संदेश प्रभुदेसाई, साहित्यिक देविदास कदम, ज्ञानप्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष चेतन देसाई उपस्थित राहणार आहेत. संयोजक म्हणून श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या डॉ रूपा च्यारी, प्रविण्या भांगले, अग्रज देसाई, मल्लिकेत देसाई, श्रुती फळदेसाई आणि श्रद्धानंद विद्यालयाच्या सीमा प्रभुगावकर व दुर्गेश गावकर जबाबदारी सांभाळतील. या कार्यक्रमाला अरुण भट, कमलाकर म्हाळशी, भूषण प्रभुगावकर, अजित पैंगीणकर आणि स्वातंत्र्यसैनिक गंगाधर लोलयेकर यांना खास अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.