ऑस्ट्रेलियात दौऱ्यात होणार पाच कसोटी
वृत्तसंस्था/ कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया
या वर्षाच्या उत्तरार्धात भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून पाच कसोटींच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेआधी भारताला एक डे-नाईट सराव सामना खेळण्याची संधी मिळणार आहे.
22 नोव्हेंबरपासून पर्थमधील कसोटीने या मालिकेची सुरुवात होईल. 1991-92 नंतर प्रथमच या दोन संघांत पाच कसोटींची मालिका खेळविण्यात येणार आहे. दोन दिवसीय डे-नाईट सराव सामना पंतप्रधान एकादश संघाविरुद्ध कॅनबेरातील मनुका ओव्हल येथे 30 नोव्हेंबर-1 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे.
या दोन संघांत अॅडलेड येथे डे-नाईट कसोटी खेळविली जाणार आहे. त्यासाठी पाहुण्या संघाला सरावासाठी मनुका ओव्हल येथे सामना ठेवण्यात आला आहे. यापूर्वी 2021-22 दौऱ्यात भारत-ऑस्ट्रेलिया संघांत डे-नाईट कसोटी झाली होती. भारतीय संघ चौथ्यांदा पीएम एकादश संघाविरुद्ध खेळणार असून यापूर्वी पाहुण्या संघांविरुद्धचे असे 48 सामने एकच दिवस खेळविले गेले होते. पण आता ते दोन दिवसांचे करण्यात आले आहेत.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा कार्यक्रम
पहिली कसोटी 22-26 नोव्हेंबर पर्थ
दुसरी कसोटी (दि-रा) 6-10 डिसेंबर अॅडलेड
तिसरी कसोटी 14-18 डिसेंबर ब्रिस्बेन
चौथी कसोटी 26-30 डिसेंबर मेलबर्न
पाचवी कसोटी 3-7 जानेवारी 25 सिडनी.
पीएम एकादश (दि-रा) 30 नोव्हें-1 डिसेंबर कॅनबेरा.