अहिल्या परकाळे,कोल्हापूर
शालेय मैदानावर भरलेल्या बाजारात होत असलेली गोळा-बेरीज विद्यार्थ्यांना आनंद देऊन जाते.यातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच स्वयंरोजगार, व्यवहारी ज्ञान, नवनिर्मितीची संकल्पना, उद्योजकता, विक्री कौशल्य,व सामाजिकीकरण यातून व्यक्तीमत्व प्रगल्भ होते.एवढेच नाही तर शालेय विद्यार्थी लहानपणापासून शाळेच्या बाजारातून जमा-खर्चाचे धडे गिरवत आहेत,याचा शिक्षकांसह पालकांनाही आनंद आहे.या बाजारातील अनुभवातून एखादा विद्यार्थी उद्योजक झाला तरी शाळांचा उद्देश सफल होईल.
विद्यार्थ्यांना जमा-खर्चाचे आणि व्यवहारी ज्ञान मिळावे म्हणून गेल्या काही वर्षापासून शाळांमध्ये बाजार भरवला जातो.विद्यार्थी भाजी,खेळणी,बेकरीचे पदार्थ यासह खाद्य पदार्थांचे स्टॉल मांडतात.या स्टॉलवरील विक्रीच्या प्रात्यक्षिकातूनच विद्यार्थ्यांना जमा-खर्चाची माहिती मिळते.शालेय जीवनापासूनच पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारी ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत असल्याने पालकांकडूनही समाधान व्यक्त होत आहे.तसेच पालकही या शाळांमधील बाजारात सहभागी होत विविध वस्तुंची खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत,ही जमेची बाजू आहे.त्याचबरोबर आपल्या स्टॉलवरील वस्तूंच्या विक्रीतून मिळालेले पैसे पाहून विद्यार्थ्यांचा व्यवसायासंबंधी आत्मविश्वास वाढत आहे.स्वतःच्या कमाईचे पैसे पाहून पालकांच्या कष्टाची जाणीवदेखील विद्यार्थ्यांना होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद,महापालिका आणि खासगी शाळांमध्ये नियोजनपूर्वक बाजार भरवला जातो.या बाजारात विद्यार्थ्यांना आपला स्टॉल मांडण्यासाठी जागा ठरवून दिली जाते.मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाल्यानंतर स्टॉलवरील वस्तूंची विक्री सुरू होते.शाळेतील विद्यार्थी आपआपल्या मित्र-मैत्रिणींच्या स्टॉलवरील वस्तू खरेदी करतातच,पण आपल्या पालकांनाही बाजारात बोलावून वस्तू खरेदी करण्यासाठी हट्ट करतात.पालकही मोठय़ा कौतुकाने वस्तू खरेदी करून संबंधीत विद्यार्थ्यांचे कौतुक करतात.
विद्यार्थ्यांचा होतोय व्यक्तीमत्व विकास
शाळांमधील आठवडी बाजारात भाजी,फळे,खाद्य पदार्थांमध्ये वडा,भजी,समोसा,बिर्याणी,चपाती-भाजी,पराठा,बिस्कीट,चॉकलेट,शितपेय अशा अनेक वस्तू उपलब्ध असतात.शिक्षकही शाळेच्या बाजारातील पदार्थांची खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात.पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा म्हणून क्रीडा,सांस्कृतिक आणि विज्ञान स्पर्धाही घेतल्या जातात.आता बाजाराची भर पडली असून यातूनही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे.बालपणापासूनच आपल्या पाल्याला मिळणाऱया या व्यवहारी ज्ञानाबद्दल अनेक पालकांकडून शाळांचे आभार मानले जात आहे.शाळांबरोबर शिक्षण खात्यातील अधिकारीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेतील बाजाराला भेटी देऊन खरेदी करतात.अधिकाऱ्यांच्या खरेदीने विद्यार्थी सुखावला जातोच पण त्याला आणखी काहीतरी करण्याची उर्मी मिळतेय.
प्रशासनाकडून मिळतेय प्रोत्साहन
शाळांमधील बाजारातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे.शाळांच्या मागे लागून विज्ञान प्रदर्शनाप्रमाणे बाजारही भरवण्यास आग्रह धरला जातो.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण खात्यातील अधिकारी जावून भेटी देतातच पण खरेदी करून विद्यार्थ्यांच्या स्टॉलवरील खाद्यपदार्थांचा अस्वादही घेतात.हा उपक्रम शैक्षणिकदृष्टय़ा अतिशय महत्वाचा आहे.
शंकर यादव (प्रशासन अधिकारी,महापालिका प्राथमिक शिक्षण समिती)


next post