ऑनलाईन टीम / तरुण भारत :
चित्रपट जगतातील सर्वोच्च समजला जाणारा ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळा आज लॉस ऐंजलीस येथील डॉल्बी सभागृहात पार पडला. या पुरस्कार सोहळ्याकडे संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागले होते. कारण पहिल्यांदाच यंदा भारताला तीन श्रेणीत नामांकन मिळाले होते. ‘चेल्लो शो’ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म श्रेणीत, ‘ऑल दॅट ब्रीदस’ या माहितीपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री’ श्रेणीत तर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट्स’मध्ये नामांकन मिळाले होते. त्यामधील ‘द एलिफेंट व्हिस्पर’ या शॉर्ट फिल्मने बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. 41 मिनिटांची ही शॉर्ट फिल्म असून, हत्ती आणि त्याला सांभाळणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर ही शॉर्ट फिल्म भाष्य करते.
नेमकं काय आहे या शॉर्ट फिल्ममध्ये?
‘द एलिफंट व्हिस्पर’ ही तमिळ भाषेतील शॉर्ट फिल्म असून, ती गेल्या वर्षी 8 डिसेंबरला प्रदर्शित झाली होता. पिढय़ानपिढय़ा हत्तींसोबत काम करणाऱ्या आणि जंगलाच्या गरजांची जाणीव असलेल्या लोकांची ही कहाणी आहे. तामिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील रघू या अनाथ हत्तीच्या मुलाला दत्तक घेणाऱ्या बोम्मन आणि बेली नावाच्या आदिवासी जोडप्याची ही कथा आहे. बोम्मन आणि बेली हत्ती रघूला वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. सर्व अडचणींना तोंड देत तो रघूला उठवतो, ज्यामुळे या जोडप्यात आणि हत्ती रघूमध्ये घट्ट नाते तयार होते.
या चित्रपटात भारतीय कुटुंब आणि अनाथ हत्ती यांचे जबरदस्त नाते दाखवण्यात आले आहे. हत्ती आणि इतर प्राण्यांशी मानवाचे नाते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास ही शॉर्ट फिल्म मदत करते. याशिवाय तामिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाचे नैसर्गिक सौंदर्यही या शॉर्ट फिल्ममध्ये पाहायला मिळते. आदिवासींच्या जीवनाकडेही निसर्गाशी एकरूप होऊन पाहण्याची आणि भारतीय संस्कृती आणि पर्यावरण रक्षणाची परंपरा दाखवणारी ही शॉर्ट फिल्म आहे.
अधिक वाचा : ईडीच्या छाप्यानंतर नॉट रिचेबल असलेले मुश्रीफ कागलमध्ये परतले