आपचा कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांना इशारा
प्रतिनिधी /पणजी
कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सरकारला प्रश्न विचारणारे चार्ल्स कुर्रैया फाउंडेशन कोण? असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा आम आदमी पक्षाने मंगळवारी जाहीर निषेध नोंदवत, कलाकार आणि चार्ल्स कुरैया फाऊंडेशन सदस्यांच्या शिष्टमंडळाला कला अकादमीत केलेल्या कामाची पाहणी करू द्यावी, अशी मागणी ’आप’ ने केली आहे.
कला अकादमी नूतनीकरण संबंधित पत्रकारांनी प्रश्न विचारले असता गावडे यांनी चार्ल्स कोरिया फाउंडेशन कला अकादमी संबंधीच्या मुद्यांवर सरकारला हुकूम देऊ शकत नाही असे विधान केले होते. याशिवाय, त्यांच्या वास्तुकलेवरही टिप्पणी केली होती. आम आदमी पक्षाने गोविंद गावडे यांना 10 दिवसांची मुदत दिली असून येत्या दहा दिवसांत कलाकार आणि चार्ल्स कुरैया फाऊंडेशनचे सदस्य आणि इतर यांच्या शिष्टमंडळाला कला अकादमी येथे केलेल्या कामाची पाहणी करू दिली नाही तर कला अकादमीसमोर कलाकारांसह आंदोलन करण्याचा इशारा ’आप’ने दिला आहे.
कला अकादमी जपायला हवी
गावडे यांच्या वक्तव्यावर आपचे नेते राजदीप नाईक म्हणाले, मंत्री गोविंद गावडे स्वतः एक कलाकार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. यापूर्वीही कला अकादमीत असलेल्या ब्लॅक बॉक्सचे नूतनीकरण आठ-दहा वर्षांपूर्वी करण्यात आले होते. तेव्हापासून त्याचे सौंदर्य हरवले आहे. आज राज्यातील अनेक कलाकार कला अकादमीला दुसरे घर मानतात. त्यामुळे नूतनीकरणाच्या नावाखाली आम्हाला कला अकादमीचे सौंदर्य गमावायचे नाही.
गावडे यांनी निविदा न मागवता, निवडणुका जवळ आल्याने 50 कोटी रुपयांचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले. कला अकादमी नूतनीकरण संबंधित कामात काही तरी गडबड असल्यामुळेच गावडे चार्ल्स कुरैया फाऊंडेशनच्या सदस्यांना काम पाहू देत नाही, असा आरोप नाईक यांनी केला.
सरकारने कला अकादमीच्या ध्वनीयंत्रणेवर कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत, पण ती गेल्या 7-8 वर्षांपासून बंद पडली आहे. लाखो किमतीचा प्रोजेक्टर उपलब्ध आहे, मात्र एसडीएमआय केबल नाही. त्यामुळे गावडे यांनी राजीव कला मंदिर आणि रवींद्र भवनांच्या देखभालीला प्राधान्य द्यावे, असे सुरेल तिळवे म्हणाले.