जगप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री किम कार्देशियनची भगिनी कोर्टनी सध्या वंध्यत्वाच्या समस्येशी झुंजत आहे, असे तिने स्वतःच उघड केले आहे. तशी ही समस्या अनेक महिलांना असते. त्यामुळे समस्येचे विशेष अप्रुप नाही. पण कोर्टनीने त्यावर जो उपाय सुरू केला आहे, तो मात्र आयुर्वेदाचे चाहते आणि समर्थकांना सुखावणारा आहे. कारण तिने पंचकर्म चिकित्सेचा अवलंब केला आहे.
कोर्टनी स्वतः एक प्रसिद्ध मॉडेल आहे. कृत्रिम जीवनशैलीचा अतिरेक झाल्याने आणि व्यावसायिक ताण-तणाव तसेच तीव्र स्पर्धेमुळे मानवी शरीराच्या नैसर्गिक क्रियाकलापांवर विपरित परिणाम होतो, याचा अनुभव ती घेत आहे. तिला वंध्यत्वाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे निसर्गाशी जवळीक असणारी आयुर्वेद ही उपचारपद्धती तिने स्वीकारली आहे. कोर्टनीने प्रथम अशी समस्या असणाऱया कोणत्याही सामान्य महिलेप्रमाणे आयव्हीएफ (इन व्हेट्रो फर्टिलिटी) उपचारपद्धती घेऊन पाहिली. तथापि, त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे ती आयुर्वेदाकडे वळली. पंचकर्म चिकित्सा शरीरातील दूषित द्रव्य काढून टाकून शरीर शुद्ध बनविते, असे म्हटले जाते. वमन, मलत्याग, अनुवासन, निरुहम आणि नस्य अशा पाच क्रिया या प्रक्रियेत असतात. हे उपचार सुरू असताना आहाराची पथ्ये कठोरपणे पाळावी लागतात. साखर, मादक पदार्थ, अल्कोहोल आदी पदार्थांपासून पूर्णतः दूर रहावे लागते. सध्या कोर्टनी या अग्निपरीक्षेतून जात आहे. प्रतिदिन चार तास ही प्रक्रिया चालते. यामुळे वंध्यत्व दूर होऊन आपण मातृत्वाला प्राप्त होऊ शकू, असा विश्वास तिला वाटते. अनेक महिलांचाही तसा अनुभव आहे.