एफडीआय पेक्षाही 25 टक्के अधिक ः सर्वाधिक रक्कम अमेरिकेतून
नवी दिल्ली
परदेशात राहणाऱया भारतीयांनी या वर्षी पाठवलेल्या रकमेबाबत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, भारताने या वर्षात विदेशी रक्कम पाठवणुकीत 12 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या वर्षी भारतीयांनी जवळपास 100 अब्ज डॉलर्स आपल्या देशात पाठवले आहेत. भारतात शेअर बाजारात एफडीआयच्या प्रमाणापेक्षा ही रक्कम 25 टक्क्यांनी जास्त आहे.
भारतानंतर मेक्सिको, चीन आणि फिलिपाइन्सचा क्रमांक लागतो. एका अहवालानुसार, यावेळी आखाती देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनौपचारिक रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत्या. यासोबतच सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या जगातील अनेक श्रीमंत देशांमध्ये अनेक नोकऱया निर्माण झाल्या. रकमेत गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ होत आहे. येत्या काही वर्षांत त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
गेल्या वर्षी इतके डॉलर पाठवले
परदेशात राहणाऱया भारतीयांनी गेल्या वर्षी सुमारे 87 अब्ज डॉलर्स भारतात पाठवले. मोठी रक्कम अमेरिकेतून पाठवण्यात आली. 2020 ला 83 अब्ज डॉलर्स पाठवले. 2020-21 दरम्यान, यूएस, युनायटेड किंगडम आणि सिंगापूरमधून वाटा 26 टक्क्यांवरून 36 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तथापि, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, ओमान व कतार या जीसीसी देशांकडून पाठवल्या जाणाऱया रकमेत मात्र घट झाली आहे.