-कुलगुरू डॉ. फडणवीस यांना चर्चासत्रासाठी केले निमंत्रित
प्रतिनिधी/सोलापूर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून राबविण्यात आलेल्या ‘लोकल टू ग्लोबल शिक्षण’, स्किल कोर्सेस तसेच आरोग्य विभागाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल जागतिक पातळीवरील नामांकित युरोपियन राष्ट्रांमधील ‘अकॅडमिक युनियन ऑफ ऑक्सफर्ड संस्थेने’ घेतली आहे. यासाठी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना चर्चासत्रासाठी विशेष निमंत्रित केल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दृष्टीने ही अतिशय गौरवाची बाब असल्याचे डॉ. पवार यांनी म्हटले आहे. द अकॅडमिक युनियन ऑफ ऑक्सफर्ड ही जागतिक पातळीवरची एक शैक्षणिक संस्था आहे.
संपूर्ण जगातील साडेतीनशेहून अधिक विद्यापीठे तसेच संशोधन सेंटरशी ही संस्था जोडली गेली आहे. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात जागतिक पातळीवर ही संस्था काम करते. अशा या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेकडून सोलापूर विद्यापीठाची दखल घेण्यात आली आहे. ऑक्सफर्ड संस्थेकडून पुढील महिन्यात विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण जगातील 54 देशांतील शिक्षण तज्ञ तसेच शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. या 54 देशांमधून पुण्यश्लेक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची निवड करून नावीन्यपूर्ण उपक्रम व शैक्षणिक कार्याची माहिती सादर करण्यासाठी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना विशेष निमंत्रित केले आहे.
या चर्चासत्रामध्ये उच्च शिक्षण क्षेत्र व संशोधनाविषयी विस्तीर्ण चर्चा होणार आहे. अध्ययन तंत्रज्ञान, शैक्षणिक दर्जा, लोकल टू ग्लोबल एज्युकेशन आणि संशोधन कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचे, याविषयी संपूर्ण जगातील विविध राष्ट्रांमधील तज्ञ यात चर्चा करून एक दिशा ठरवणार आहेत. यामध्ये सोलापूर विद्यापीठाची देखील भूमिका मांडली जाणार आहे. याकरिता कुलगुरू डॉ. फडणवीस यांना पुढील महिन्यात होणाऱया चर्चासत्रासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे आपले विद्यापीठ जागतिक पातळीवर पोहोचणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. पवार यांनी म्हटले आहे.
राज्यपालांकडून कौतुक व शुभेच्छा!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ‘ऑक्सफर्ड’मध्ये होणाऱया विशेष चर्चासत्रासाठी निवड झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली. सादरीकरणासाठी विशेष निमंत्रित केल्याची माहितीही त्यांना सांगितली. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी विद्यापीठाचे अभिनंदन करत कुलगुरू डॉ. फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.