आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी कारवाई ः सशर्त जामिनावर सुटका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केरळमधील वरिष्ठ राजकीय नेते पी.सी. जॉर्ज यांना मुस्लिमांच्या विरोधातील कथित आक्षेपार्ह टिप्पणीसाठी रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिरुअनंतपुरम येथील पोलिसांनी रविवारी पहाटे कोट्टायम जिल्हय़ातील एराट्टुपेट्टा येथील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी जॉर्ज यांच्याविरोधात तिरुअनंतपुरम येथील एका संमेलनात द्वेषपूर्ण भाषण केल्याचा गुन्हा शनिवारी नोंदविला होता. जॉर्ज यांची सशर्त जामिनावर सुटका देखील झाली आहे.
राज्याचे पोलीस प्रमुख अनिल कांत यांच्या निर्देशानुसार माजी आमदाराच्या विरोधात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. केरळ काँग्रेसचे नेते राहिलेल्या जॉर्ज यांनी राज्यात बिगरमुस्लिमांना मुस्लीम समुदायाकडून संचालित रेस्टॉरंटमध्ये न जाण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनामुळे राज्यात वाद उभा राहिला आहे. न्यायालयाने मला सशर्त जामीन दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करत असल्याचे जॉर्ज यांनी म्हटले आहे.
अनंतपुरी हिंदू महासंमेलनाच्या अंतर्गत आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना जॉर्ज यांनी हे वादग्रस्त भाषण केले होते. मुस्लिमांकडून चालविण्यात येणाऱया रेस्टॉरंटमध्ये ‘नंपसुकतचे कारण ठरणाऱया थेंबां’चा वापर करत चहा विकला जातोय, यामागे देशावर नियंत्रण मिळविण्याचा उद्देश असल्याचा आरोप जॉर्ज यांनी कार्यक्रमात बोलताना केला होता.
केरळ विधानसभेत 33 वर्षांपर्यंत पूंजर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱया 70 वर्षीय जॉर्ज यांनी बिगरमुस्लिमांना मुस्लिमांकडून संचालित व्यवसायांवर बहिष्कार टाकण्याचेही आवाहन केले हेते. राज्यात सत्तेवर असलेला माकप तसेच काँग्रेस पक्षाने जॉर्ज यांच्या वक्तव्याची निंदा केली होती. काँग्रेसने जॉर्ज यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती.