वीरेंद्र हेगडे, के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांचीही समावेश
ऑनलाईन टीम/तरुण भारत
धावपटू पी. टी. उषा (P T Usha), संगीतकार इलैयाराज (Composer Ilayaraja) यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी ट्विट करून ही माहिती दिली. तसेच कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिराचे प्रमुख वीरेंद्र हेगडे (Virendra Hegade), पटकथाकार के. व्ही. विजयेंद्र प्रसाद (V. Vijayendra Prasad) यांचीही मोदी सरकारने राज्यसभेवर नामनियुक्त सदस्य म्हणून निवड केली आहे. हे चारही मान्यवर दक्षिण भारतातील आहेत.
राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे दिली आहे. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी लिहिले की, “व्ही. विजयेंद्र प्रसाद गारु हे अनेक दशकांपासून सर्जनशील जगाशी जोडलेले आहेत. त्यांच्या कलाकृतींतून भारताच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडते आणि जागतिक स्तरावर त्यांचा ठसा उमटला आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्याबद्दल अभिनंदन करतो.”
हे ही वाचा : गोविंद पानसरेंच्या हत्येचा तपास ATS कडे सोपवा; कुटुंबीयांकडून विनंती
पटकथाकार के. व्ही. विजयेंद्र राव हे आंध्र प्रदेशचे असून बाहुबली, आरआरआर, बजरंगी भाईजानसारख्या चित्रपटांशी त्यांचे नाव जोडलेले आहे. प्रख्यात ॲथलिट पी. टी. उषा या केरळ तर संगीतकार इलयराजा हे तामिळनाडू, वीरेंद्र हेगडे हे कर्नाटकमधील मूळ रहिवासी आहेत. नामनियुक्त खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल चौघांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तेलंगणातील हैदराबादमध्ये नुकतीच बैठक झाली. दक्षिण भारतातील राज्यांवर यापुढे अधिक लक्ष केंद्रित करण्याचे भाजपने ठरविले होते. त्यावर या बैठकीने शिक्कामोर्तब केले.