वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सुरू असलेल्या माद्रिद स्पेन मास्टर्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने एकेरीत उपांत्यफेरी गाठली आहे. मात्र, पुरुष एकेरीमध्ये भारताच्या किदाम्बी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आले आहे.
2023 च्या बॅडमिंटन हंगामामध्ये भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूची उपांत्यफेरीत प्रवेश मिळविण्याची ही पहिली स्पर्धा आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूने डेन्मार्कच्या 19 व्या मानांकित मिया ब्लिचफिल्डचा 21-14, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. अलीकडच्या काही स्पर्धांमध्ये पी. व्ही. सिंधू आपला सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळाले होते. मध्यंतरी तिला दुखापतीमुळे बरेच दिवस बॅडमिंटन क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते. त्यामुळे तिचे महिला बॅडमिंटनपटूंच्या क्रमवारीतील स्थान घसरले होते. तिला पहिल्या दहा बॅडमिंटनपटूंमध्ये स्थान मिळवता आले नाही. आता सिंधूचा उपांत्यफेरीतील सामना सिंगापूरच्या बिगर मानांकित येवो जिया मिनबरोबर होणार आहे. माद्रिद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा ही 300 दर्जाची आहे.
पुरुषांच्या विभागात भारताच्या किदाम्बी श्रीकांतला जपानच्या टॉप सीडेड निशिमोटोकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. जपानच्या निशिमोटोने किदाम्बी श्रीकांतचे आव्हान 21-18, 21-15 असे संपुष्टात आणत उपांत्यफेरी गाठली.