जळगाव / प्रतिनिधी :
जिल्हयातील पाचोरा ते जामनेर रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर आणि बोदवडपर्यंत विस्तारीकरणासाठी लागणारा 995 कोटींचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे. तसेच जालना जळगाव रेल्वेमार्गाचा 174 किमी नवीन मार्गाचा डीपीआर रेल्वेबोर्डाला सादर करण्यात आला असून, मंजूर झाला आहे. हा रेल्वेमार्ग पाच वर्षात पूर्ण होईल, अशी घोषणा माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जामनेर येथे केली.
जामनेर येथे एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दानवे म्हणाले, रेल्वे अर्थसंकल्पात यावेळी सर्वाधिक 11 हजार कोटी रूपये मिळाले आहेत. पाचोरा-जामनेर या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे, तसेच हा मार्ग बोदवडपर्यंत विस्तारावा अशी सातत्याने खासदार रक्षा खडसे यांची मागणी होती. ही मागणी मान्य करत हा मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात येणार असून बोदवडपर्यंत या मार्गाचे विस्तारीकरण करण्यात येईल. यासाठी 995 कोटींचा खर्च अपेक्षित असून हा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करेल.
अधिक वाचा : PFI च्या निशाण्यावर संघ मुख्यालय, भाजपचे ज्येष्ठ नेते
मराठवाडयातून खानदेशला जोडणारा जालना-जळगाव हा पहिला रेल्वेमार्ग प्रस्तावित असून या मार्गाचा अंतीम सर्व्हे झालेला असून, या 174 किमी मार्गाचे सर्वेक्षण होऊन डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट रेल्वे बोर्डाला सादर केला गेला आहे. या नव्या मार्गामुळे खानदेश हा दक्षिण भारताशी जोडला जाईल, असे दानवे यांनी सांगितले.