टाटा स्टीलचे माजी एमडी ः वयाच्या 86 व्या वषी घेतला जगाचा निरोप
जमशेदपूर / वृत्तसंस्था
भारताचे ‘स्टील मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. जमशेद जे. इराणी यांचे नुकतेच वयाच्या 86 व्या वषी निधन झाले. पद्मभूषण इराणी यांनी जमशेदपूर येथील टाटा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ‘टाटा स्टील’ गुपचे माजी व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी डेझी इराणी आणि त्यांची तीन मुले झुबिन, निलोफर आणि तानाज आहेत. डॉ. इराणी यांच्या उद्योगातील योगदानाबद्दल त्यांना 2007 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2008 मध्ये त्यांना धातुशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या सेवेबद्दल भारत सरकारने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता.
जमशेद जे. इराणी जून 2011 मध्ये टाटा स्टीलच्या संचालक मंडळातून निवृत्त झाले होते. त्यांनी कंपनीला अनेक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय किर्ती मिळवून दिली होती. एक दूरदर्शी व्यक्ती म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील, असे ‘टाटा स्टील’ने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला भारताच्या आर्थिक उदारीकरणादरम्यान जमशेद इराणी यांनी टाटा स्टीलचे नेतृत्व केले. भारतातील पोलाद उद्योगाच्या वाढीसाठी आणि विकासात त्यांनी मोठे योगदान दिले. 2 जून 1936 रोजी नागपुरात जीजी इराणी आणि खोरसेद इराणी यांच्या घरी जन्मलेल्या जमशेद इराणी यांनी 1956 मध्ये नागपूरच्या सायन्स कॉलेजमधून बीएससी आणि 1958 मध्ये नागपूर विद्यापीठातून प्राणीशास्त्रात एमएससी केले. त्यानंतर ते जेएन टाटा स्कॉलर म्हणून ब्रिटनमधील शेफिल्ड विद्यापीठात गेले. तेथून त्यांनी 1960 मध्ये मेटलर्जीमध्ये पीएचडी पदवी संपादन केली. त्यानंतर 1963 मध्ये त्यांनी धातुशास्त्रातही पीएचडी पदवी मिळवली.
जमशेद इराणी यांनी 1963 मध्ये शेफील्डमधील ब्रिटीश आयर्न अँड स्टील रिसर्च असोसिएशनमधून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. परंतु त्यांनी नेहमीच आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याचा विचार केला. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (सध्याची टाटा स्टील) मध्ये काम करण्यासाठी ते 1968 मध्ये भारतात परतले. त्यानंतर ते संशोधन आणि विकास विभागाच्या प्रभारी संचालकांचे सहाय्यक म्हणून कंपनीत रुजू झाले. जमशेद इराणी 1981 मध्ये टाटा स्टीलच्या मंडळात सहभागी झाले आणि 2001 पासून एक दशक ते बिगर कार्यकारी संचालक होते. जमशेद इराणी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.