वर्ल्ड हॅप्पीनेस अहवालात भारत 125 व्या स्थानी ः फिनलंड सर्वात आनंदी ः अफगाणिस्तान सर्वात दुःखी देश
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
इंटरनॅशनल हॅप्पीनेस डे निमित्त वार्षिक हॅप्पीनेस रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. 137 देशांच्या यादीत भारत 125 व्या स्थानावर आहे. भारताचे शेजारी देश पाकिस्तान (108), म्यानमार (72), नेपाळ (78), बांगलादेश (102) आणि चीन (64) यांना याहून चांगले स्थान मिळाले आहे. अहवालात फिनलंड हा जगातील सर्वात आनंदी देश असल्याचे म्हटले गेले आहे. फिनलंडला सलग सहाव्यांदा पहिले स्थान मिळाले आहे.
या यादीत अफगाणिस्तानला 137 वे म्हणजेच अंतिम स्थान मिळाले आहे. अहवालानुसार तेथील लोक सर्वाधिक दुःखी आहे. सर्वात कमी आनंदी देशांच्या यादीत लेबनॉन, झिम्बाम्बे, द डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये भ्रष्टाचार अधिक असून लोकांमध्ये दीर्घायुष्याची आशा खूपच कमी आहे.
हा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कने जारी केला आहे. हा अहवाल 150 हून अधिक देशांमधील लोकांवर करण्यात आलेल्या जागतिक सर्वेक्षणाच्या डाटाच्या आधारावर तयार केला जातो. यात दरडोई उत्पन्न, सामाजिक आधार, राहणीमान, स्वातंत्र्य, भ्रष्टाचार आणि उदारमतवाद इत्यादी घटकांचा विचार केला जातो.
युक्रेनची स्थिती भारतापेक्षा चांगली
रशिया-युक्रेनमध्ये मागील एक वर्षापासून युद्ध सुरू आहे. तरीही हॅप्पीनेस इंडेक्समध्ये त्यांचे स्थान भारतापेक्षा चांगले आहे. रशियाला 70 वे तर युक्रेनला 92 वे स्थान मिळाले आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असूनही भारत या यादीत खूपच खालच्या स्थानावर राहतो.
हॅप्पीनेस निर्देशांक
स्थान देश सरासरी आयुष्य मूल्य
1 फिनलंड 7.804
2 डेन्मार्क 7.586
3 आइसलँड 7.530
4 इस्रायल 7.473
5 नेदरलँड्स 7.403
6 स्वीडन 7.395
7 नॉर्वे 7.315
8 स्वीत्झर्लंड 7.240
9 लक्झेम्बर्ग 7.228
10 न्यूझीलंड 7.123
125 भारत 4.640