इम्रान यांच्या लाँग मार्चमुळे घेतला निर्णय
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
सौदी अरेबियाचे पंतप्रधान आणि युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने याची पुष्टी दिली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ हे युवराज सलमान यांच्या दौऱयाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेल्या पाकिस्तानला युवराज सलमान हे या दौऱयात 4.1 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर करणार होते.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लाँग मार्चमुळे पाकिस्तानातील अफरातफरी अन् तणावाची स्थिती आहे. याचमुळे युवराज सलमान यांनी हा दौरा रद्द केला आहे. इम्रान खान हे लवकर निवडणूक घ्यावी या मागणीसाठी इस्लामाबादमध्ये धरणे आंदोलन सुरू करणार आहेत. इम्रान यांच्यावरील गोळीबारामुळे पाकिस्तानात हिंसाचार होण्याचीही भीती व्यक्त होत आहे.
पाकिस्तानची फजिती
मागील महिन्यात शाहबाज शरीफ हे सौदी अरेबियाच्या दौऱयावर गेले होते. या यात्रेदरम्यान सौदीने पाकिस्तानला कुठल्याही स्वरुपात मदतीची घोषणा न करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला होता. परंतु युवराज सलमान हे नोव्हेंबरच्या अखेरीस इस्लामाबादमध्ये येतील आणि पाकिस्तानला मोठय़ा मदतीची घोषणा करतील असे ठरले हेते. याचमुळे युवराज सलमान यांच्या दौऱयाची प्रतीक्षा केली जात होती. परंतु त्यांचा हा दौरा आता रद्द झाला आहे. पाकिस्तानचे विदेश मंत्रालय यासंबंधी काहीही सांगणे टाळत आहे. हा दौरा केवळ टाळला गेला असल्याचे पाक सरकारचे म्हणणे आहे.
पाकसमोरील आर्थिक संकट
पाकिस्तानच्या विदेश चलन साठय़ाचे मूल्य सध्या केवळ 7-8 अब्ज डॉलर्सदरम्यान आहे. यातही सुमारे 2.5 अब्ज डॉलर्स सौदी अरेबियाकडे हमी रक्कम म्हणून जमा आहे. पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून उधारीवर कच्चे तेल पुरविण्यात येत आहे. 1.5 अब्ज डॉलर्सची रक्कम संयुक्त अरब अमिरातने पाकिस्तानला दिली आहे. ही देखील हमी रक्कम आहे. हमी रकमेचा अर्थ हा पैसा पाकिस्तान सरकारच्या खजिन्यात राहणार असला तरीही तेथील सरकारला या रकमेचा वापर किंवा खर्च करता येणार नाही.