झमानचे शतक, नसीम-रौफचे प्रत्येकी 3 बळी, कूपर, एडवर्ड्स, विक्रमजित यांची झुंज वाया
वृत्तसंस्था/ रॉटरडॅम, नेदरलँड्स
सलामीवीर फख्र झमानने नोंदवलेले सातवे वनडे शतक, कर्णधार बाबर आझमचे अर्धशतक, शादाब खान, सलमान यांची जोरदार फटकेबाजी आणि हॅरिस रौफ व नसीम शाह यांची भेदक गोलंदाजी यांच्या बळावर पाकिस्तानने येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान नेदरलँड्सवर 16 धावांनी विजय मिळवित तीन सामन्यांच्या मालिवत 1-0 अशी आघाडी घेतली.
पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि फलंदाजीस अनुकूल खेळपट्टीवर सावध सुरुवात केल्यानंतर 50 षटकांत 6 बाद 314 धावांचा डोंगर उभा केला. नेदरलँड्सनेही जोरदार प्रत्युत्तर देताना या आव्हानाचा पाठलाग करण्याचा चांगला प्रयत्न केला. पण शेवटी ते 17 धावांनी कमी पडले. निर्धारित 50 षटकांत त्यांना 8 बाद 298 धावांपर्यंत मजल मारता आली.
पाकच्या डावात झमानने 109 चेंडूत 12 चौकार, एक षटकारासह 109 धावा जमविल्या तर कर्णधार बाबर आझमने 74 धावांचे योगदान दिले. त्याने 85 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार मारला. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीला पाकच्या फलंदाजांवर चांगला अंकुश ठेवला होता. सहाव्या षटकात इमाम उल हक केवळ 2 धावांवर बाद झाला तेव्हा फलकावर पाकच्या 10 धावा लागल्या होत्या. पण झमान व बाबर यांनी दुसऱया गडय़ासाठी 170 चेंडूत 168 धावांची भागीदारी करून डाव सावरला आणि संघाला सुस्थितीही प्राप्त करून दिली. प्रथम बाबर एका मिसटाईम्ड फटक्यावर बाद झाला. दोन षटकानंतर झमान अचूक फेकीवर धावचीत झाला. पाक संघ साडेतीनशेची मजल मारेल असे वाटले होते. पण हॉलंडच्या फिरकी गोलंदाजांनी अचूक मारा करीत त्यांना जास्त मोकळीक दिली नाही. मात्र हॉलंडच्या क्षेत्ररक्षकांनी गचाळ क्षेत्ररक्षण करीत अनेक झेल सोडले.
आव्हानाचा पाठलाग करताना हॉलंडच्या डावाची सुरुवात खराब झाली, 13 व्या षटकात त्यांची स्थिती 3 बाद 62 अशी झाली असताना अनुभवी टॉम कूपर (54 चेंडूत 65) व 19 वर्षीय विक्रमजित सिंग (98 चेंडूत 65) यांनी चौथ्या गडय़ासाठी 97 धावांची भागीदारी करून डाव सावरला. अखेरच्या 24 चेंडूत 48 धावांची गरज असताना कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने जोरदार फटकेबाजी करीत 60 चेंडूत नाबाद 71 धावांची खेळी केली. पण शेवटी त्याचे प्रयत्न अपुरे पडले आणि 16 धावांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. एडवर्ड्सने आपल्या खेळीत 6 चौकार, 1 षटकार मारला. पाकचा पदार्पणवीर नसीम शाहने 3, रौफने 3, मोहम्मद वासिम व मोहम्मद नवाझ यांनी एकेक बळी मिळविले. दुसरा सामना याच ठिकाणी आज गुरुवारी व शेवटचा सामना रविवारी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः पाक 50 षटकांत 6 बाद 314 ः फख्र झमान 109 (109 चेंडूत 12 चौकार, 1 षटकार), बाबर आझम 74 (85 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), रिझवान 17 चेंडूत 14, खुशदिल शाह 18 चेंडूत 21, शादाब खान नाबाद 48 (28 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), आगा सलमान नाबाद 27 (16 चेंडूत 3 चौकार), अवांतर 15. गोलंदाजी ः लोगान व्हान बीक 2-89, बास डी लीडे 2-42, व्हिवियन किंगमा 1-61.
नेदरलँड्स 50 षटकांत 8 बाद 298 ः विक्रमजित सिंग 65 (98 चेंडूत 5 चौकार), बास डी लीडे 16, टॉम कूपर 65 (54 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), स्कॉट एडवर्ड्स नाबाद 71 (60 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), तेजा निदामनुरु 15, लोगान व्हान बीक 24 चेंडूत 28, अवांतर 29. गोलंदाजी ः रौफ 3-67, नसीम शाह 3-51, वासिम 1-55, नवाझ 1-35.