टी-20 विश्वचषक : पाकला उपांत्य फेरी गाठण्याची अल्पशी संधी, अष्टपैलू शदाब सामनावीर, इफ्तिखारचे अर्धशतक, शाहीनचे 3 बळी
वृत्तसंस्था /सिडनी
सामनावीर शदाब खानचे अष्टपैलू प्रदर्शन, इफ्तिखार अहमदचे अर्धशतक व गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी यांच्या बळावर पाकिस्तानने टी-20 विश्वचषक स्पर्धेत सुपर 12 फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठण्याचा आशा पुनरुज्जीवित केल्या आहेत. दोन विजयासह त्यांचे आता 4 गुण झाले असून त्यांचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
शदाबने फलंदाजीत 22 चेंडूत 52 धावांची वेगवान खेळी करीत पाकला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 185 धावांची मजल मारून दिली. त्यानंतर शाहीन शाह आफ्रिदी व शदाब खान यांनी द.आफ्रिकेची आघाडी फळी उद्ध्वस्त करीत पाकचा विजय सोपा केला. पावसाच्या व्यत्ययानंतर डीएलएस नियमानुसार द.आफ्रिकेला 14 षटकांत 142 धावा काढण्याचे नवे उद्दिष्ट मिळाले. पण त्यांना 14 षटकांत 9 बाद 108 धावांवर रोखत पाकने शानदार विजय नोंदवला.
पाक तिसऱया स्थानी
या विजयाने पाकचे 4 गुण झाले असून ते तिसऱया स्थानावर पोहोचले आहेत. द.आफ्रिका 5 गुणांसह दुसऱया स्थानावर कायम असून भारत 6 गुणांसह अग्रस्थानी आहे. पाकला उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल आणि त्याचवेळी भारताविरुद्ध झिम्बाब्वे विजयी होण्याची त्यांना अपेक्षा करावी लागेल. द.आफ्रिकेचा शेवटचा सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार असल्याने त्यांचा विजय व उपांत्य फेरीतील स्थान निश्चित मानले जात आहे.
द.आफ्रिकेला सुधारित उद्दिष्ट
186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया द.आफ्रिकेला शाहीन आफ्रिदीने क्विन्टॉन डी कॉक (0) व रिली रॉसो (7) यांना स्वस्तात बाद करून धक्के दिले. त्यानंतर शदाबने कर्णधार तेम्बा बवुमा (36) व एडन मार्करम (20) यांचे बळी मिळविल्यानंतर द.आफ्रिकेची स्थिती 9 षटकांत 4 बाद 69 अशी झाली होती. पावसाच्या व्यत्ययानंतर डीएलएस नियमानुसार द.आफ्रिकेला 14 षटकांत 142 धावांचे नवे टार्गेट मिळाले. त्यामुळे उर्वरित 5 षटकांत (30 चेंडूत) त्यांना 73 धावा काढण्याची गरज होती. ट्रिस्टन स्टब्स (18) व हेन्रिच क्लासेन (15) यांनी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या खेळी अल्पजीवी ठरल्यानंतर द.आफ्रिकेचा पराभव निश्चित झाला.
क्लासेनने शदाबला स्लॅपचा चौकार मारल्यानंतर शाहीनला त्याने लागोपाठ दोन चौकार ठोकले. पण तो पाचव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. द.आफ्रिकेला डेव्हिड मिलरची यावेळी प्रकर्षाने उणीव जाणवली. दुखापतीमुळे तो या सामन्यात खेळू शकला नाही. यानंतर चौकार, षटकार मारण्याच्या नादात ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले आणि 20 षटकाअखेर त्यांना 9 बाद 108 धावांपर्यंत मजल मारता आली. शाहीनने 3, शदाबने 2, नसीम शाह, वासिम व रौफ यांनी एकेक बळी मिळविले.
शदाब, इफ्तिखारची फटकेबाजी
तत्पूर्वी, कर्णधार बाबर आझम (6) व मोहम्मद रिझवान (4), मोहम्मद हॅरिस (11 चेंडूत 28) व शान मसूद (2) लवकर बाद झाल्याने पाकची 7 षटकाअखेर 4 बाद 43 अशी पडझड झाली. हॅरिसने पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी केली. पण तो जास्त वेळ टिकला नाही. नॉर्त्जेने त्याला पायचीत केले. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार, 3 षटकार मारले. नंतर इफ्तिखार अहमदने 35 चेंडूत 51 धावा जमवित अँकरची भूमिका बजावली. त्याने प्रथम मोहम्मद नवाझसमवेत 52 धावांची भागीदारी केली आणि नंतर शदाब खानसमवेत 35 चेंडूत सहाव्या गडय़ासाठी 82 धावांची भागीदारी करीत संघाला पावणेदोनशेची मजल मारून दिली. शदाबने तुफान फटकेबाजी करीत केवळ 22 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांच्या मदतीने 52 धावा झोडपल्या. मात्र 177 या धावसंख्येवरच पाकचे 3 फलंदाज बाद झाल्याने पाकला दोनशेचा टप्पा गाठण्यात यश आले नाही. द.आफ्रिकेच्या ऍन्रिच नॉर्त्जेने सर्वाधिक 4 बळी मिळविले तर पार्नेल, एन्गिडी, रबाडा व शमसी यांनी एकेक बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 20 षटकांत 9 बाद 185 ः रिझवान 4, बाबर आझम 6, मोहम्मद हॅरिस 28 (11 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), मसूद 2, इफ्तिखार अहमद 51 (35 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), मोहम्मद नवाझ 28 (22 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), शदाब खान 52 (22 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), नसीम शाह नाबाद 5, रौफ नाबाद 3, अवांतर 6. गोलंदाजी ः नॉर्त्जे 4-41, शमसी 1-36, एन्गिडी 1-32, रबाडा 1-44, पार्नेल 1-31.
द.आफ्रिका (सुधारित टार्गेट 14 षटकांत 142) ः 14 षटकांत 9 बाद 108 ः बवुमा 36 (19 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), डी कॉक 0, रॉसो 7, मार्करम 20 (14 चेंडूत 4 चौकार), क्लासेन 15 (9 चेंडूत 3 चौकार), स्टब्स 18 (18 चेंडूत 1 षटकार), पार्नेल 3, अवांतर 2. गोलंदाजी ः शाहीन आफ्रिदी 3-14, शदाब खान 2-16, वासिम 1-13, नसीम शाह 1-19, रौफ 1-44.
पाकचा फखर झमान विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
पाकचा आक्रमक फलंदाज फखर झमानला गुडघ्याची दुखापत झाल्याने टी-20 विश्वचषक स्पर्धेतून त्याला बाहेर पडावे लागत आहे. ऑस्ट्रेलियात या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी झमानला या दुखापतीचा त्रास जाणवत होता.
रविवारी नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात खेळताना गुडघा दुखापतीची समस्या अधिकच चिघळली. त्याला सातत्याने वेदना जाणवू लागल्या. या समस्येमुळे गुरुवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तो खेळू शकला नाही. आता पाकिस्तानचा गट-2 मधील शेवटचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. मात्र, या सामन्यासाठी तो उपलब्ध होऊ शकणार नाही, असे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.