रडारवर सैन्याधिकारी ः सोशल मीडियाचा हेरगिरीसाठी वापर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गोपनीय माहिती प्राप्त करण्यासाठी पाकिस्तान आणि चीनने ऑनलाइन हनीट्रपचा सापळा रचला असून याकरता सैन्याच्या अधिकाऱयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सैन्याधिकाऱयांना लक्ष्य करत क्लासिफाइड इन्फॉर्मेशन (गोपनीय माहिती) मिळविण्याचा कट आहे. याप्रकरणी भारतीय तपास यंत्रणांकडून चौकशी असून यात सायबर सुरक्षेच्या उल्लंघनाचा पैलूही विचारात घेतला जातोय.
काही व्हॉट्सऍप ग्रूप्सच्या द्वारे गोपनीय माहिती उघड केली जातेय का याचा तपास करण्यात येत आहे. सेवेत असलेल्या सैन्याधिकाऱयांसह निवृत्त अधिकारी देखील या ग्रूप्समध्ये सामील आहेत. तसेच या व्हॉट्सऍप ग्रूप्समध्ये सामान्य नागरिक देखील सामील आहेत.
चीन आणि पाकिस्तानचे हेर गोपनीय माहिती प्राप्त करण्यासाठी अनेक वाममार्गांचा अवलंब करत आहेत. याचमुळे भारतीय सैन्याने मागील काही वर्षांपासून सातत्याने स्वतःच्या सदस्यांना अधिकृत कामादरम्यान व्हॉट्सऍपचा वापर न करण्याची सूचना केली आहे. तसेच संवेदनशील काम करतेवेळी स्वतःचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकौंट डिलीट करण्याचा निर्देश दिला आहे.
पाकिस्तान आणि चीनच्या गुप्तचर यंत्रणांनी गोपनीय माहिती प्राप्त करण्यासाठी सापळा रचला आहे. सैनिक तसेच सैन्याधिकाऱयांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर लक्ष्य करण्यात येत आहे. मागील काही काळात अशा प्रकरणांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले आहे.
मागील काही वर्षांमध्ये पाकिस्तानी हस्तकांनी महिला असल्याचे भासवून व्हर्च्युअली भारतीय सैन्याधिकाऱयांना सापळय़ात अडकविले आहे. ऑनलाईन संभाषणाद्वारे गोपनीय माहिती प्राप्त करण्यात आली आहे. 2018 मध्ये भारतीय वायुदलाच्या मुख्यालयात तैनात एक ग्रूप कॅप्टन देखील याला बळी पडला होता. नौदलाने देखील स्वतःच्या सर्व सदस्यांवर फेसबुक वापरण्यास बंदी घातली आहे. तसेच नौदलाचे तळ आणि डॉकयार्डसह युद्धनौकांवर स्मार्टफोन नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.