Tarun Bharat

पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याचा देशभरात निषेध

मोदींवरील वादग्रस्त टिप्पणीप्रश्नी माफीची मागणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री बिलावल भुत्तो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपकडून देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बिलावल भुत्तो यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. शुक्रवारीही भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर निदर्शने केली होती. ओसामा बिन लादेन मेला, पण गुजरातचा कसाई अजूनही जिवंत असून तो आता भारताचा पंतप्रधान असल्याची वादग्रस्त टिप्पणी बिलावल भुत्तो यांनी गुरुवारी केली होती.

पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री भुत्तो यांच्या या वक्तव्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. दिल्लीत शनिवारीही संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयासमोर निदर्शने केली. त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावले, पण बेकायदा जमावाने बॅरिकेड्सही तोडले. यानंतर दिल्ली पोलिसांनी अनेक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दिल्लीबरोबरच देशाच्या अन्य भागातही शनिवारी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत बिलावल यांच्या प्रतिमेचे दहन केले.

बिलावल भुत्तो हे एका अयशस्वी देशाचे प्रतिनिधी आहेत आणि ते स्वतः अपयशी ठरले आहेत. दहशतवादी मानसिकता असलेल्या लोकांकडून आणखी काय अपेक्षा करू शकता, असे भारताच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मिनाक्षी लेखी म्हणाल्या होत्या. तर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही पाकिस्तानवर टीकेची झोड उठवत त्यांना कदाचित 1971 चे विस्मरण झाले असावे, असे भाष्य केले होते.

बिलावलला संबोधले ‘पाकिस्तानचा पप्पू’

निदर्शनात सहभागी असलेले भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी बिलावलला ‘पाकिस्तानचा पप्पू’ असे संबोधले आहे. बहुतेक देशांना पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत. मोदींच्या नेतृत्वाखाली आज जग दहशतवादाविरुद्ध एकवटले आहे. बिलावलची आई बेनझीर भुत्तो यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यानंतरही तो दहशतवाद्यांच्या पाठीशी उभा असल्याबद्दल आश्चर्य वाटते, असे सूर्या म्हणाले.

Related Stories

तुर्कस्तानशी ‘मैत्री’ पाकिस्तानला महागात

Patil_p

रत्नागिरीतील आंतरराष्ट्रीय कॉलचे पाकिस्तान कनेक्शन उघड

Archana Banage

अल्प प्रतिसादाने लसीचा साठा फेकण्याची वेळ

Patil_p

मुत्सद्दी कीव्हमध्ये परतल्यास याद राखा

Patil_p

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाबाबत बायडेन प्रशासन सकारात्मक

datta jadhav

सौदीच्या सैन्यात सामील होणार महिला

Patil_p