वृत्तसंस्था/ गॅले
येथे सुरू असलेल्या यजमान लंकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत पाकला निर्णायक विजयासाठी 120 धावांची जरुरी असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे आहेत. उभय संघामध्ये दोन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात आहे. पाकच्या दुसऱया डावात अब्दुल्ला शफीकने नाबाद शतक (112) झळकविले.
या पहिल्या कसोटीत लंकेचा पहिला डाव 222 धावांवर आटोपल्यानंतर पाकने पहिल्या डावात 218 धावा जमविल्या. लंकेला पहिल्या डावात केवळ 4 धावांची आघाडी मिळाली. लंकेने 9 बाद 329 या धावसंख्येवरून आपल्या दुसऱया डावाला मंगळवारी चौथ्या दिवसाच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 100 षटकात 337 धावावर आटोपला. लंकेच्या दुसऱया डावात चंडिमलने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 139 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह नाबाद 94 धावा झळकविल्या. ओशादा फर्नांडोने 1 षटकार आणि 6 चौकारासह 64 तर कुशल मेंडिस 9 चौकारासह 76 धावा झळकविल्या. डिसिल्वाने 20 तर रमेश मेंडिसने 22 धावा झळकविल्या. पाकतर्फे मोहमद नवाजने 88 धावात 5 तर यासीर शहाने 122 धावात 3 तसेच हसन अली आणि नसीम शहा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पाकला निर्णायक विजयासाठी 342 धावांचे आव्हान लंकेने दिले.
पाकच्या दुसऱया डावाला दमदार सुरुवात झाली. सलामीचा अब्दुल शफीक आणि इमाम उल हक यांनी सलामीच्या गडय़ासाठी 87 धावांची भागीदारी केली. रमेश मेंडिसने इमाम उल हकला बाद केले. त्याने 3 चौकासह 35 धावा जमविल्या. अझहर अली जयसुर्याच्या गोलंदाजीवर 6 धावांवर झेलबाद झाला. अब्दुल्ला शफीक आणि कर्णधार बाबर आझम यांनी संघाला सुस्थितीत नेताना तिसऱया गडय़ासाठी 101 धावांची भर घातली. बाबर आझमने 104 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 55 धावा जमविल्या. अब्दुल्ला शफीक 289 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 112 धावा तर मोहमद रिझवान 7 धावावर खेळत आहेत. दिवसअखेर पाकने दुसऱया डावात 85 षटकात 3 बाद 222 धावा जमविल्या. या कसोटीत कर्णधार बाबर आझमने पहिल्या डावात शतक (119 धावा) झळकविल्या होत्या. मोहमद शफीकचे कसोटीतील हे दुसरे शतक आहे. या सामन्यात कर्णधार बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार धावांचा टप्पाही गाठला आहे. लंकेतर्फे जयसुर्याने 89 धावात 2 तर रमेश मेंडिसने एक गडी बाद केला.
शहाने करून दिली वॉर्नची आठवण
या कसोटीमध्ये पाकचा फिरकी गोलंदाज यासीर शहाने सोमवारी खेळाच्या तिसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाचा जागतिक दर्जाचा फिरकी गोलंदाज दिवंगत शेन वॉर्नच्या गेलंदाजीची आठवण करून दिली. यासीर शहाने लंकेच्या कुशल मेंडिसला त्रिफळाचित केले. यासीर शहाचा हा चेंडू लेग स्टम्पच्या बाहेरून जात होता पण कुशल मेंडिसला या चेंडूचा अंदाज आला नाही. त्याने हा चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला पण या चेंडूने यष्टीचे वेध घेतले. शेन वॉर्नने आपल्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये अशा फसव्या चेंडूवर अनेक मातब्बर फलंदाजांना बाद केल्याची आठवण यासीर शहाच्या या चेंडूने करून दिली. 1993 साली ऍशेस मालिकेतील इंग्लंड विरुद्धच्या मँचेस्टर येथील पहिल्या कसोटीत शेन वॉर्नच्या अशा फसव्या चेंडूवर इंग्लंडचा फलंदाज माईक गॅटिंगचा त्रिफळा उडाला होता.
संक्षिप्त धावफलक ः लंका प. डाव 222, पाक प. डाव 218, लंका दु. डाव 100 षटकात सर्वबाद 337 (चंडिमल 94, कुशल मेंडिस 76, ओशादा फर्नांडो 64, रमेश मेंडिस 22, डिसिल्वा 20, करुणारत्ने 16, मोहमद नवाज 5-88, यासीर शहा 3-22, हसन अली 1-19, नसीम शहा 1-24), पाक दु. डाव 85 षटकात 3 बाद 222 (अब्दुल्ला शफीक खेळत आहे 112, इमाम उल हक 35, अझहर अली 6, बाबर आझम 55, मोहमद रिझवान खेळत आहे 7, जयसुर्या 2-89, रमेश मेंडिस 1-76).