Tarun Bharat

पाकिस्तान अद्याप 42 धावांनी पिछाडीवर

सौद शकीलचे शतक, इमाम-उल-हक, सर्फराज अहमदची अर्धशतके

वृत्तसंस्था/ कराची

येथील नॅशनल स्टेडियमवरील न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्यात तिसऱया दिवशीअखेरीस यजमान पाकिस्तान संघाने यष्टीरक्षक सौद शकीलचे नाबाद शतक आणि सर्फराज अहमद, इमाम-उल-हकची अर्धशतके यांच्या जोरावर पहिल्या डावातील पिछाडी बऱयापैकी भरून काढली. सध्या ते 42 धावांनी पिछाडीवर असून एकच गडी शिल्लक राहिला आहे. पण शकील अजूनही मैदानात असल्याने पाकिस्तानला आणखी पिछाडी भरून काढण्याची आशा आहे.

तिसऱया दिवशी केवळ चार गडी शिल्लक आणि 295 धावांनी पिछाडीवर अशा बिकट स्थितीत सापडलेल्या पाकिस्तानला संकटातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान इमाम-उल-हक आणि शकील यांच्यापुढे होते. टीम साऊदीने इमामला बाद करण्यापूर्वी चौथ्या गडय़ासाठी या दोघांनी 83 धावांची भागीदारी केली. इमामने 165 चेंडूंत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 83 धावा केल्या. त्यानंतर शकील आणि सर्फराज अहमद यांनी संयमाने फलंदाजी करून पाचव्या गडय़ासाठी 150 धावांची भागीदारी रचून पाकिस्तानची पिछाडी 117 वर आणली. न्यूझीलंडने पहिल्या डावात 449 धावा जमविल्या आहेत.

टॉम ब्लंडेलच्या चेंडूवर डॅरिल मिशेलने यष्टिचित करण्यापूर्वी सर्फराजने सलग तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने 10 चौकारांसह 78 धावा केल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 6000 धावा पूर्ण करणारा तो कामरान अकमलनंतरचा पाकिस्तानचा दुसरा यष्टिरक्षक बनला. सर्फराजचा अडथळा न्यूझीलंडने दूर सारल्यानंतर आगा सलमानने शकीलसोबत सहाव्या गडय़ासाठी 53 धावांची भागीदारी केली. यादरम्यान शकीलने 240 चेंडूंत आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. एजाझ पटेलने 41 धावा करणाऱया सलमानला बाद करून ही जोडी फोडली.

पाकिस्तानला पहिल्या डावात आघाडी घेण्याची चांगली संधी आहे असे वाटत असतानाच हसन अली, मीर हमजा आणि नसीम शाह हे स्वस्तात बाद झाले. मात्र दुसरी बाजू शकीलने लावून धरून खेळ संपला तेव्हा तो 124 धावांवर नाबाद होता आणि अब्रार अहमद त्याला साथ करत होता. एजाझ पटेलने 3, ईश सोधीने 2 बळी टिपले.

संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड प.डाव 449, पाक प. डाव 9 बाद 407 ः इमाम-उल-हक 83 (165 चेंडूंत 10 चौकार, 1 षटकार), सौद शकील खेळत आहे 124 (336 चेंडूंत 17 चौकार), सर्फराज अहमद 78 (109 चेंडूंत 10 चौकार), आगा सलमान 41 (78 चेंडूंत 41 धावा), बाबर आझम 24, शान मसूद 20, अब्दुल्ला शफीक 19, टीम साऊदी 1-62, मॅट हेन्री 1-58, एजाझ पटेल 3-88, ईश सोधी 2-94.

Related Stories

दुखापतग्रस्त प्रणॉय उपांत्य फेरीत पराभूत

Patil_p

भारतीय महिलांना सांघिक नेमबाजीत सुवर्ण

Amit Kulkarni

अंधांच्या तिरंगी मालिकेत पाक विजेता

Patil_p

दिल्ली बुल्स संघाची विजयी सलामी

Patil_p

पंजाबकडून लिव्हिंगस्टोनला सर्वाधिक 11.5 कोटी

Patil_p

कर्नाटकाचा आंध्रप्रदेशवर 7 गडी राखून निर्विवाद विजय

Patil_p