चीन दौऱयापूर्वी पंतप्रधान करणार नियुक्ती
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानला नोव्हेंबरमध्ये नवा सैन्यप्रमुख मिळणार असल्याची माहिती संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी दिली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ नोव्हेंबरमध्ये नव्या सैन्यप्रमुखाची नियुक्ती करणार आहेत. पीएमएल-एन पक्षाचे अध्यक्ष नवाज शरीफ यांच्याशी चर्चा करून पंतप्रधान शाहबाज निर्णय घेणार असल्याचे आसिफ यांनी सांगितले आहे.
शाहबाज शरीफ आणि आसिफ अली झरदारी हे स्वतःच्या निकटवर्तीयाला सैन्यप्रमुख म्हणून नियुक्त करू इच्छितात असा दावा माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अलिकडेच केला होता. या पार्श्वभूमीवर आसिफ यांनी हे विधान केले आहे. नवाज शरीफ यांनी 4 वेळा सैन्यप्रमुख निवडण्याची जबाबदारी पार पाडली आहे. आता शाहबाज शरीफ ही जबाबदारी पार पाडणार आहेत. घटनेत सैन्यप्रमुखांच्या नियुक्तीसंबंधी धोरणे स्पष्ट असली तरीही इम्रान खान या प्रक्रियेत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत. सैन्यप्रमुखांच्या नियुक्तीला वादग्रस्त करण्याचा इम्रान खान यांचा प्रयत्न असल्याचा आरोप आसिफ यांनी केला आहे.
चीन दौऱयावर जाणार
नव्या सैन्यप्रमुखांची नियुक्ती केल्यावर पंतप्रधान शाहबाज शरीफ हे चीनच्या दौऱयावर जाणार आहेत. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या निमंत्रणावर शाहबाज हे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात चीनमध्ये जाणार असल्याचे आसिफ यांनी सांगितले.