शाब्दिक बाचाबाचीमुळे तणावपूर्ण लढतीत अफगाणला 1 गडी राखून हरवले
शारजाह /वृत्तसंस्था
शेवटच्या षटकापर्यंत अतिशय अटीतटीने लढवल्या गेलेल्या आणि शाब्दिक बाचाबाचीमुळे तणावपूर्ण राहिलेल्या आशिया चषक टी-20 स्पर्धेच्या सुपर-4 फेरीत पाकिस्तानने अगदी अंतिम क्षणी अफगाणिस्तानवर केवळ एक गडी राखून रोमांचक विजय मिळवला आणि येथेच अफगाणचे आव्हान संपुष्टात आले. अफगाणने 20 षटकात 6 बाद 129 धावा केल्यानंतर पाकिस्तानने 19.2 षटकात 9 बाद 131 धावांसह निसटता विजय मिळवला. नसीम शाहने शेवटच्या षटकातील पहिल्या 2 चेंडूत सलग 2 षटकार खेचत या सामन्याला जोरदार कलाटणी दिली.
पाकिस्तान व श्रीलंका यांनी प्रत्येकी 4 गुणांसह फायनलमधील स्थान निश्चित केले तर अफगाण व भारत यांचे आव्हान संपुष्टात आले. पाकिस्तानतर्फे शदाब खानने सर्वाधिक 36 तर इफ्तिकार अहमदने 30 धावा केल्या.
तत्पूर्वी, पाकिस्तानने अफगाणला निर्धारित 20 षटकात 6 बाद 129 अशा माफक धावसंख्येवर रोखले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर हझरतुल्ला झॅझॅई (21) व यष्टीरक्षक-फलंदाज रहमनुल्लाह गुरबाझ (17) यांनी 36 धावांची सलामी दिली. गुरबाझने दुसऱया षटकात मोहम्मद हसनैनला लागोपाठ दोन षटकार खेचत 16 धावा वसूल केल्या. झॅझॅईने देखील दोन चौकार फटकावत धावगती उंचावण्याचा प्रयत्न केला. करीम जनत (15) व इब्राहिम झॅद्रन (37 चेंडूत 35) यांनी त्यानंतर डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान ः 20 षटकात 6 बाद 129 (इब्राहिम झॅद्रन 37 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 35, हझरतुल्लाह 17 चेंडूत 21, गुरबाझ 17, रशिद खान नाबाद 18, अझमतुल्लाह नाबाद 10).
पाकिस्तान ः 19.2 षटकात 9 बाद 131 (शदाब खान 26 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह 36, इफ्तिकार अहमद 33 चेंडूत 2 चौकारांसह 30, मोहम्मद रिझवान 26 चेंडूत 20, नसीम शाह 4 चेंडूत नाबाद 14, असिफ अली 8 चेंडूत 16. फझलहक फारुकी 3.2 षटकात 3-31, फरीद अहमद 4 षटकात 3-31, रशिद खान 4 षटकात 2-25).
अफगाणने 19 व्या षटकात कमावले अन् शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूत गमावले!
शेवटच्या 2 षटकात 21 धावांचे संरक्षण करण्याचे लक्ष्य असताना अफगाणने फरीद अहमदकडे 19 वे षटक सोपवले आणि फरीदनेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत 10 धावांमध्ये हॅरीस रौफ व असिफ अली असे 2 बळी घेतले. नसीम शाह व मोहम्मद हसनैन ही पाकिस्तानची शेवटची जोडी क्रीझवर असल्याने अफगाणचा संघ यामुळे विजयासाठी भक्कम स्थितीत होता. मात्र, शेवटच्या षटकात फझलहक फारुकीने सलग दोन फुलटॉस टाकले आणि नसीम शाहने हे दोन्ही फुलटॉस लाँगऑफच्या दिशेने उत्तुंग फटकावत सलग दोन षटकारांसह विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले!
पाकिस्तान-श्रीलंका यांच्यात रविवारी जेतेपदासाठी फायनल
यंदाच्या आशिया चषक स्पर्धेतील फायनल पाकिस्तान-श्रीलंका यांच्यात होईल, हे देखील या निकालाने स्पष्ट झाले. अफगाणने पाकिस्तानला नमवले असते तर जर-तरच्या समीकरणात भारताच्या आशाअपेक्षा पल्लवित होणे साहजिक होते. पण, प्रत्यक्षात पाकिस्तानने रोमांचक विजय मिळवला आणि या निकालाने अफगाणसह भारताचे आव्हान देखील संपुष्टात आले.
अवघ्या 33 धावात 6 फलंदाज गारद, तरीही पाकिस्तानने जिद्द हरली नाही!
विजयासाठी 130 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना पाकिस्तानचा संघ एकवेळ 15 षटकात 3 बाद 85 अशा भक्कम स्थितीत होता. मात्र, त्यानंतर 18.5 षटकात पाहता पाहता त्यांचा डाव 9 बाद 118 असा गडगडला. अवघ्या 33 धावांत 6 फलंदाज गमवावे लागले असताना या प्रतिकूल स्थितीतही नसीम शाहने शेवटच्या षटकातील पहिले दोन चेंडू उत्तुंग षटकारांसाठी भिरकावून दिले आणि येथेच अफगाणचे विजयाचे मनसुबेही धुळीस मिळाले.
असिफ अली-फरीद यांच्यात शाब्दिक बाचाबाची
शारजाहमधील या लढतीत असिफ अली व फरीद यांच्यात झटापट व शाब्दिक बाचाबाची झाल्याने बराच तणाव निर्माण झाला. असिफ अली बाद होऊन परतत असताना फरीद त्याच्या मार्गात आला आणि असिफनेही ग्लोव्ह्जने त्याला मागे ढकलत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मैदानी पंच व अफगाणी खेळाडूंनी या उभयतांनाही बाजूला सारत या वादावर पडदा टाकला. पण, तणावाची स्थिती अखेरपर्यंत कायम राहिली!