ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंजाबमधील तरणतारण येथील आंतरराष्ट्रीय सीमेवरुन भारतीय हद्दीत घुसखोरी करणारा पाकिस्तानी ड्रोन जवानांनी हाणून पाडला. तरणतारण पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सुरक्षा दलांनी ड्रोनसह तीन किलो हेरॉईन जप्त केले आहे. डीजीपी पंजाब गौरव यादव यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवरील तरणतारण येथे शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा दलाच्या जवानांना अज्ञात ड्रोनची हालचाल दिसली. ड्रोनचा आवाज ऐकताच 103 बटालियनच्या सैनिकांनी ड्रोनच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर ड्रोन दिसेनासा झाला. त्यावेळी परिसरात शोधमोहिम राबविण्यात आली. मात्र, ड्रोन आढळून आला नाही.
अधिक वाचा : दादा भुसेंना पालकमंत्रीपदावरून हटवा; भाजप नेत्याची फडणवीसांकडे मागणी
आज सकाळी पुन्हा संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. त्यावेळी शेतात पडलेला ड्रोन सापडला. या ड्रोनला तीन किलो हेरॉईनची पाकिटे बांधण्यात आली होती. त्याची किंमत आंतराष्ट्रीय बाजारात 15 कोटी रुपये आहे.