बीएसएफकडून कारवाई ः इंपोर्टेड गन हस्तगत
वृत्तसंस्था / अमृतसर
पंजाबच्या अमृतसरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफने पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान घातले आहे. या घुसखोराच्या मृतदेहाजवळून एक इंपोर्टेड गन हस्तगत करण्यात आली आहे. नव्या वर्षातील घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यास बीएसएफला यश आले आहे. बीएसएफने मृतदेह ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.
अमृतसरच्या सेक्टर अंतर्गत येणाऱया चन्ना सीमाचौकीच्या क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. बीएसएफच्या 73 बटालियनचे जवान सीमेवर गस्त घालत असताना त्यांना मानवी हालचाल दिसून आली. घुसखोर भारतीय सीमेपासून 500 मीटर अंतरावर निर्माण करण्यात आलेल्या तारांच्या कुंपणापर्यंत पोहोचला होता. बीएसएफ जवानांनी त्याला थांबण्याची सूचना केली असता त्याने पळण्याचा प्रयत्न केला. यामुळे जवानांना गोळीबार करावा लागला आहे.
बीएसएफ जवानांनी मृत घुसखोराकडून पंप गन देखील हस्तगत केली आहे. घुसखोराने जवानांच्या दिशेने गोळीबार केला होता की नाही याची अद्याप पुष्टी मिळालेली नाही. तस्करांच्या मदतीने तो भारतीय सीमेत दाखल झाला असावा असा अनुमान व्यक्त केला जात आहे.
बीएसफने मागील वर्षी 2 घुसखोरांना ठार केले होते. तर 22 घुसखोरांना ताब्यात घेतले होते. तसेच चुकून भारतीय सीमेत पोहोचलेल्या 9 पाकिस्तानी नागरिकांना 24-28 तासांच्या आत पाकिस्तानी रेंजर्सच्या स्वाधीन केले होते.