वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांचे पुत्र हमझा शाहबाज यांना मनी लाँड्रींग प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळाला आहे. त्यांना अटक करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती पाकिस्तानच्या तपास यंत्रणेने न्यायालयाला दिल्यानंतर त्यांना अटकपूर्व जामीन संमत करण्यात आला. शाहबाज शरीफ यांच्यावर एक हजार 400 कोटी पाकिस्तानी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पदच्युत पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने हा आरोप ठेवला होता. या प्रकरणी चौकशी पूर्ण करण्यात आली आहे.
इम्रान खान सत्तेवर असताना तपास यंत्रणेची भूमिका आताच्या नेमकी उलट होती. शाहबाज शरीफ यांच्याविरोधात भक्कम पुरावा असल्याचा दावा या यंत्रणेकडून करण्यात येत होता. तथापि, आता सत्तापालट झाल्यानंतर तपास यंत्रणेची भूमिकाही बदलल्याचे दिसून येत आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने तपास यंत्रणेच्या या नव्या भूमिकेला कडाडून विरोध केला आहे.