तपास यंत्रणेने केला होता विरोध
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याच्या 41 दिवसांमध्येच शाहबाज शरीफ हे एका विशेष न्यायालयासमोर हजर राहिले. सुमारे 16 अब्ज रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शाहबाज आणि त्यांचे पुत्र तसेच पंजाबचे मुख्यमंत्री हमजा शरीफ हे आरोपी आहेत. न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर करत 28 मेपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे.
शाहबाज यांनी स्वतःवर झालेले सर्व आरोप राजकीयदृष्टय़ा प्रेरित असल्याचा दावा केला. तर तपास यंत्रणा एफआयएने (फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजेन्सी) दोन्ही पित्रा-पुत्र फरार राहिलेले असल्याने त्यांना जामीन मंजूर करू नये असा युक्तिवाद सुनावणीदरम्यान केला होता. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शाहबाज शरीफ आणि हमजा यांच्याविरोधातील प्रकरणांमध्ये कुठल्याही तपास अधिकाऱयाची बदली किंवा नवी नियुक्ती करण्यास मज्जाव केला आहे.
शरीफ कुटुंब स्वतःच्या विरोधातील खटल्यांना कमकुवत करण्यासाठी स्वतःच्या पसंतीच्या लोकांची नियुक्ती करत असतात असा आरोप इम्रान खान यांच्या पक्षाने केला आहे. शाहबाज आणि त्यांचे पुत्र हमजा यांच्याकरता न्यायालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जागतिक बँकेच्या अधिकाऱयांसोबत बैठक पार पडल्यावर शाहबाज शरीफ यांना अर्थसंकल्पसंबंधी घोषणा केली आहे. पाकिस्तानचा 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प 10 जून रोजी सादर करण्यात येणार आहे. जागतिक बँक पाकिस्तान सरकारला आर्थिक मदत करणार आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून सुमारे 8 अब्ज डॉलर्सची मदत मिळाली आहे.
इम्रान आक्रमक
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शाहबाज सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. इम्रान यांच्या पक्षाने 25-29 मेपर्यंत पाकिस्तानच्या विविध शहरांमधून राजधानी इस्लामाबादपर्यंत लाँग मार्च काढण्याची घोषणा केली आहे.