श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील एलओसीजवळ शनिवारी भारतीय लष्कराने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले. दहशतवाद्यांनी नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यादरम्यान सुरक्षा जवानांना घुसखोरीची कुणकुण लागताच त्यांनी संबंधिताला माघारी फिरण्याचा इशारा दिला. मात्र, दहशतवाद्याने माघारी न फिरता भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दहशतवाद्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने चकमक झाली. या संघर्षात दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. त्याचा मृतदेह सापडला असून काही दस्तावेज व शस्त्रास्त्रेही हाती लागली आहेत. त्याच्याकडील कागदपत्रे व इतर साहित्याची तपासणी केली असता तो पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.