Tarun Bharat

पाकच्या अब्रार अहमदचे पदार्पणातच 7 बळी

वृत्तसंस्था/ मुल्तान

शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्यात यजमान पाकने इंग्लंडला पहिल्या डावात 281 धावात रोखले. कसोटी पदार्पण करणाऱया अब्रार अहमदने 114 धावात 7 गडी बाद केले. दिवसअखेर पाकने पहिल्या डावात 2 बाद 107 धावा जमवित सामन्यावर पकड राखली आहे.

या मालिकेतील रावळपिंडीच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाकचा 74 धावांनी पराभव करून आघाडी मिळविली आहे. 2005 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडचा संघ पाकच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळत आहे. या दुसऱया कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कसोटी पदार्पण करणारा लेगस्पिनर अब्रार अहमदच्या जादुमय फिरकीसमोर इंग्लंडचा डाव कोलमडला. इंग्लंडच्या डावात बेन डकैट आणि ओली पॉप यांनी अर्धशतके झळकविली. या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 79 धावांची भागीदारी केली. अब्रार अहमदने सलामीच्या क्रॉलेचा 19 धावांवर त्रिफळा उडविला. त्यानंतर त्याने डकैटला पायचीत केले. डकैटने 49 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 63 धावा जमविल्या. रुट आणि ब्रुक यांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. अब्रार अहमदचे चेंडू खूपच खाली रहात असल्याने इंग्लंडच्या फलंदाजांना फलंदाजी करणे अवघड गेले. रुट 8 धावांवर पायचीत झाला. पॉपने 61 चेंडूत 5 चौकारांसह 60 धावा जमविल्या. कर्णधार स्टोक्सने 38 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 30 तर जॅक्सने 44 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 31 धावा जमविल्या. या जोडीने सहाव्या गडय़ासाठी 61 धावांची भर घातली. मार्क वूडने 27 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 36 धावा जमविल्याने इंग्लंडला 281 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडचा पहिला डाव 51.4 षटकात 281 धावात आटोपला. पाकतर्फे अब्रार अहमदने 114 धावात 7 गडी तर झहीद मेहमूदने 63 धावात 3 गडी बाद केले. इंग्लंडच्या डावामध्ये 3 फलंदाज पायचीत झाले. या कसोटीत खेळाचे पहिले सत्र 30 मिनिटाने वाढवण्यात आले होते. या सत्रात इंग्लंडने 5 बाद 180 धावांपर्यंत मजल मारली होती. उपाहारानंतर अब्रार अहमदने आपल्या सलग दोन षटकात स्टोक्स आणि जॅक्स यांचे बळी मिळविले. मुल्तानची खेळपट्टी गोलंदाजीला थोडीफार साथ देत असल्याचे जाणवले. या दुसऱया कसोटीसाठी पाक संघामध्ये तीन बदल करण्यात आले. वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ आणि नसीम शहा दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकले नाहीत. तर अझहर अलीला वगळण्यात आले. अष्टपैलू मोहम्मद नवाजला संधी देण्यात आली आहे.

इंग्लंडचा पहिला डाव 281 धावांवर आटोपल्यानंतर पाकने दिवसअखेर पहिल्या डावात 28 षटकात 2 बाद 107 धावांपर्यंत मजल मारली. पाकच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील तिसऱया षटकात अँडरसनने इमाम उल हकला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. त्यानंतर लिचने शफीकला पॉपकरवी झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 14 धावा जमविल्या. शफीक आणि कर्णधार बाबर आझम यांनी दुसऱया गडय़ासाठी 46 धावांची भर घातली. बाबर आझम आणि शकील यांनी शेवटच्या सत्रात संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही. या जोडीने तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 56 धावांची भागीदारी केली. बाबर आझम 1 षटकार आणि 9 चौकारांसह 61 तर शकील 5 चौकारांसह 32 धावांवर खेळत आहे. पाकचा संघ अद्याप 174 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात आहे.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड प. डाव 51.4 षटकात सर्वबाद 281 (डकैट 63, पॉप 60, स्टोक्स 30, जॅक्स 31, मार्क वूड नाबाद 36, अब्रार अहमद 7-114, झहीद मेहमूद 3-63), पाक प. डाव 28 षटकात 2 बाद 107 (बाबर आझम खेळत आहे 61, शकील खेळत आहे. 32, शफीक 14, इमाम उल हक 0, अँडरसन 1-4, लिच 1-44).

Related Stories

वनडे मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

Patil_p

लंका-ऑस्ट्रेलियात पाच टी-20 सामने

Patil_p

न्यूझीलंडची मालिकेत विजयी सलामी

Patil_p

जोकोविचची सलामीची लढत ड्रेपरशी

Amit Kulkarni

चिलीचा सांचेझ जखमी

Patil_p

मेयर्सच्या नाबाद शतकामुळे विंडीज सुस्थितीत

Patil_p