भारतीय वंशाच्या निक्की हेलींची घोषणा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारतीय वंशाच्या निक्की हेली या 2024 मध्ये होणाऱया अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टीच्या संभाव्य उमेदवार आहेत. निक्की यांनी 15 फेब्रुवारीपासून स्वतःच्या प्रचारमोहिमेस प्रारंभ केला आहे. हेली यांनी आपण अध्यक्ष झालो तर अमेरिकेचे शत्रू म्हणजेच चीन आणि पाकिस्तानसोबत कुठल्याही प्रकारची नरमाई बाळगणार नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या शत्रूंना मिळणारी विदेशी मदत बंद केली जाणार आहे. अमेरिकेचा द्वेष करणाऱयांना एक टक्केही मदत मिळणार नसल्याचा दावा निक्की यांनी केला आहे.
निक्की या माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेच्या प्रतिनिधी राहिल्या आहेत. याचबरोबर त्यांनी दक्षिण कॅरोलिनाचे गव्हर्नर म्हणून काम केले आहे. अमेरिकेचा द्वेष करणाऱया प्रत्येक देशाला केली जाणारी मदत पूर्णपणे बंद करणार आहे. एका मजबूत अमेरिकेला वाईट लोकांसाठी काहीही करण्याचा अधिकार नाही. गौरवशाली अमेरिका आमच्या जनतेची कमाई अशाप्रकारे नष्ट होऊ देणार नाही. अमेरिकेच्या शत्रूंच्या विरोधात उभे ठाकणारे नेतेच आमच्या विश्वासास पात्र आहेत असे निक्की यांनी एका लेखात म्हटले आहे.
पाकिस्तान दहशतवाद्यांचा पाठिराखा
इराकला आम्ही एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक मदत मागील काही वर्षांमध्ये केली आहे, तरीही तेथील सरकार ईराणमधील मारेकऱयांना जवळ करत आहे. ‘अमेरिका नष्ट करण्याच्या’ घोषणा देतो आणि आमच्या सैनिकांवर हल्ला करणारा देश इराणच आहे. बिडेन प्रशासनाने पाकिस्तानलाही सैन्यमदत दिली आहे. पाकिस्तान 12 हून अधिक दहशतवादी संघटनांचे केंद्र असून तेथील सरकार पूर्णपणे चीनसाठी समर्पित असल्याचा आरोप निक्की हेली यांनी केला आहे.
अमेरिकेच्या मित्रांविरोधात दुष्प्रचार अध्यक्ष जो बिडेन आणि त्यांच्या पथकाने अब्ज डॉलर्स संयुक्त राष्ट्रसंघाच्या भ्रष्ट यंत्रणेला दिले आहेत. या रकमेचा वापर अमेरिकेचा सहकारी देश इस्रायल विरोधात दुष्प्रचार करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे