नेदरलँडस्चा सहा गडय़ांनी पराभव, शदाब खान सामनावीर
वृत्तसंस्था/ पर्थ
आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने सलग दोन पराभवानंतर विजयाचे खाते उघडले. रविवारी येथे झालेल्या गट 2 मधील सामन्यात पाकने नेदरलँडस्चा सहा गडय़ांनी पराभव केला. या विजयामुळे पाक संघाने स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
रविवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडस्ने 20 षटकात 9 बाद 91 धावा जमवल्या. पाकच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांना शतक पार करता आले नाही. नेदरलँडस्चे उद्दिष्ट गाठण्यासाठी पाकला आपले चार गडी गमवावे लागले. त्यांनी 13.5 षटकात 4 बाद 95 धावा जमवत हा सामना 6 गडय़ांनी जिंकला.
पाकच्या दर्जेदार वेगवान गोलंदाजीसमोर नेदरलँडस्ने पॉवर प्लेमध्ये केवळ 18 धावा जमवल्या. तिसऱया षटकापासून त्यांच्या डावाला गळती सुरू झाली. बेस डिलेडी दुखापतीमुळे निवृत्त झाला. नेदरलँड्सच्या डावात ऍकरमन आणि कर्णधार स्कॉट एडवर्डस् या दोन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. ऍकरमनने 27 चेंडूत 2 चौकारासह 27 तर एडवर्ड्सने 20 चेंडूत 1 चौकारासह 15 धावा जमविल्या. पाकतर्फे शदाब खानने 22 धावात 3 तर शाहीन आफ्रिदी, नसिम शहा आणि हॅरीस रौफ यांनी प्रत्येकी एक त्याचप्रमाणे मोहमद वासीमने 15 धावात 2 गडी बाद केले. नेदरलँडस्च्या डावात 5 चौकार नोंदवले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावात सलामीच्या मोहमद रिझवानने 39 चेंडूत 5 चौकारासह 49, फक्र झमानने 16 चेंडूत 3 चौकारासह 20, शान मसूदने 12, बाबर आझमने 4, इफ्तिकार अहमदने नाबाद 6 तर शदाब खानने नाबाद 4 धावा जमवल्या. मोहमद रिझवान आणि फखर झमान यांनी दुसऱया गडय़ासाठी 37 धावांची भर घातली. पाकच्या डावामध्ये 10 चौकार नोंदवले गेले. नेदरलँडस्तर्फे ग्लोव्हरने 22 धावात 2 तर मीकेरेनने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः नेदरलँडस् 20 षटकात 9 बाद 91 (ऍकरमन 27, एडवर्ड्स 15, शदाब खान 3-22, मोहमद वासीम 2-15, शाहीन आफ्रिदी, नसीम शहा, हॅरीस रौफ प्रत्येकी एक बळी), पाक 13.5 षटकात 4 बाद 95(मोहमद रिझवान 49, फखर झमान 20, बाबर आझम 4, शान मसूद 12, ग्लोव्हर 2-22, मीकेरेन 1-19).