ब्लंडेल, लॅथम, ब्रेसवेल यांची अर्धशतके, न्यूझीलंड दु. डाव 5 बाद 277
वृत्तसंस्था /कराची
दुसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीतील गुरुवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर न्यूझीलंडने पाकला निर्णायक विजयासाठी 319 धावांचे आव्हान दिले असून पाकने दुसऱया डावात बिनबाद 2 धावा जमविल्या. न्यूझीलंडने आपला दुसरा डाव 5 बाद 277 धावांवर घोषित केला. न्यूझीलंडतर्फे लॅथम, ब्लंडेल आणि ब्रेसवेल यांनी अर्धशतके झळकविली.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती. या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात 449 धावा जमविल्यानंतर पाकने पहिल्या डावात 408 धावा केल्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात 41 धावांची आघाडी मिळविली. पाकने 9 बाद 407 या धावसंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा डाव 408 धावांवर आटोपला. पाकच्या पहिल्या डावामध्ये शकीलने 341 चेंडूत 17 चौकारांसह नाबाद 125, सर्फराज अहमदने 10 चौकारांसह 78, इमाम उल हकने 1 षटकार आणि 10 चौकारांसह 83, बाबर आझमने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24, शान मसूदने 4 चौकारांसह 20 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे आझाद पटेल आणि सोधी यांनी प्रत्येकी 3 तर साउदी, हेन्री आणि मिचेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
41 धावांची आघाडी मिळविल्यानंतर न्यूझीलंडने गुरुवारी आपला दुसरा डाव 82 षटकात 5 बाद 277 धावांवर घोषित केला. सलामीच्या लॅथमने 11 चौकारांसह 62, ब्लंडेलने 1 षटकार आणि 7 चौकारांसह 74, कर्णधार विल्यम्सनने 6 चौकारांसह 41, बेसवेलने 11 चौकारांसह नाबाद 74 धावा झळकविल्या. लॅथम आणि विल्यम्सन यांनी दुसऱया गडय़ासाठी 109 धावांची भागीदारी केली. पाकतर्फे नसीम शहा, मीर हामजा, अब्रार अहमद, हसन अली आणि आगा सलमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पाकने दिवसअखेर बिनबाद 2 धावा जमविल्या. शेवटच्या दिवशी पाकला विजयासाठी 317 धावांची जरुरी आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड प. डाव 449, पाक प. डाव 133 षटकात सर्वबाद 108 (शकील नाबाद 125, सर्फराज अहमद 78, आगा सलमान 41, इमाम उल हक 83, बाबर आझम 24, शान मसूद 20, आझाद पटेल 3-83, सोधी 3-95, साउदी, हेन्री, मिचेल प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड दु. डाव 82 षटकात 5 बाद 277 (डाव घोषित), (लॅथम 62, विल्यम्सन 41, ब्लंडेल 74, बेसवेल नाबाद 74, नसीम शहा, हामजा, अब्रार अहमद, हसन अली, सलमान प्रत्येकी 1 बळी), पाक दु. डाव 2.5 षटकात बिनबाद 2.