Tarun Bharat

पहिल्या कसोटीत पाकचे इंग्लंडला चोख प्रत्युत्तर

इंग्लंडचा 657 धावांचा डोंगर, पाक बिनबाद 181

वृत्तसंस्था रावळपिंडी

यजमान पाक आणि इंग्लंड यांच्यातील येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात 657 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर पाकने पहिल्या डावात दिवसअखेर 51 षटकात बिनबाद 181 धावा जमवित चोख प्रत्युत्तर दिले. या कसोटीत इंग्लंडतर्फे चार फलंदाजांनी शतके झळकविली. पाकतर्फे अब्दुल्ला शफीक 89 तर इमाम उल हक 90 धावांवर खेळत आहे.

पाकच्या भूमीवर तब्बल 17 वर्षांनंतर होणाऱया कसोटी सामन्यात अनेक विक्रम नोंदविले जाण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. इंग्लंडने 4 बाद 506 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे उर्वरित 6 गडी 151 धावात बाद झाले. स्टोक्स आणि ब्रुक या जोडीने 5 व्या गडय़ासाठी 53 धावांची भर घातली. नसीम शहाने कर्णधार स्टोक्सचा त्रिफळा उडविला. त्याने 2 षटकार आणि 6 चौकारांसह 41 धावा जमविल्या. कसोटी पदार्पण करणारा लिव्हिंगस्टोन केवळ 9 धावा जमवित नसीम शहाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. शतकवीर ब्रुक सातव्या गडय़ाच्या रूपात तंबूत परतला. त्याने 116 चेंडूत 5 षटकार आणि 19 चौकारांसह 153 धावा झळकविल्या. जॅक्सने 4 चौकारांसह 30 तर रॉबिन्सनने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 37 धावांचे योगदान दिले. उपाहारापूर्वी इंग्लंडचा पहिला डाव 101 षटकात 657 धावांवर समाप्त झाला. पाकतर्फे जाहीद मेहमूदने 4, नसीम शहाने 3, मोहम्मद अलीने 2 तर रौफने 1 गडी बाद केला. उपाहारावेळी पाकने बिनबाद 17 धावा जमविल्या होत्या. 2016 साली मँचेस्टर येथे झालेल्या पाकविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 8 बाद 589 धावांचा डोंगर उभा केला होता. पाकविरुद्धचा हा विक्रम इंग्लंडने मागे टाकला. पाकतर्फे कसोटी पदार्पण करणारा फिरकी गोलंदाज जाहीद मेहमूदने 235 धावांच्या मोबदल्यात 4 बळी मिळविले. लंकेचा फिरकी गोलंदाज सूरज रणदीवने भारताविरुद्ध 2010 साली कोलंबोच्या कसोटीत खेळताना 222 धावात 2 गडी बाद केले होते. हॅरी बुकने आपल्या पहिल्या दिवसाच्या 101 या धावसंख्येमध्ये 52 धावांची भर घातली. स्वीपचा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला.

इंग्लंडच्या 657 या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना पाकने आपल्या डावाला सावध सुरुवात केली. खेळाच्या दोन सत्रामध्ये त्यांनी धावांची घाई न करता बचावात्मक फलंदाजीवर भर दिला. या जोडीने 51 षटकात बिनबाद 181 धावा जमविल्या. शफीक 2 षटकार आणि 10 चौकारांसह 89 तर इमाम उल हक 1 षटकार आणि 13 चौकारांसह 90 धावांवर खेळत आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांना दुसऱया दिवशीच्या खेळामध्ये पाकची ही सलामीची जोडी फोडता आली नाही. रावळपिंडीची खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल असल्याने पाक संघाकडूनही मोठी धावसंख्या रचली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड प. डाव 101 षटकात सर्वबाद 657 (क्रॉले 122, डकैट 107, ओली पॉप 108, ब्रुक 153, स्टोक्स 41, रुट 23, जॅक्स 30, रॉबिन्सन 37, जाहीद मेहमूद 4-235, नसीम शहा 3-140, मोहम्मद अली 2-124, रौफ 1-78), पाक 51 षटकात बिनबाद 181 (अब्दुल्ला शफीक खेळत आहे 89, इमाम उल हक खेळत आहे 90).

Related Stories

ऑस्ट्रेलियन स्पर्धेत शरापोव्हाला वाईल्डकार्ड प्रवेश

Patil_p

वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटनमध्ये भारतीयांना कठीण ड्रॉ

Patil_p

इमा रॅडूकनूची सराव स्पर्धेतून माघार

Patil_p

टी-10 क्रिकेट ऑलिम्पिकसाठी योग्य

Patil_p

एएफसी चॅम्पियन्स लीगचे पूर्व विभागीय सामने आता कतारमध्ये

Patil_p

क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आर्थिक नुकसानीची भीती

Patil_p