पणजीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक यांची माहिती : म्हापशातील मिरवणुकही रात्री 10 पर्यंतच : नाटेकर
पणजी “: पणजीत आज शिमगोत्सव स्पर्धा आणि भव्य मिरवणूक होणार असून कोणत्याही परिस्थितीत रात्री 10 च्या आत मिरवणूक संपविण्याचा इरादा शिमगोत्सव समितीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक यांनी व्यक्त केला आहे. वेळेबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. वेळेचे बंधन जे पाळणार नाहीत त्यांना स्पर्धेतून बाहेर काढावे लागेल, असे नाईक म्हणाले. फ्ढाsंडा येथे बुधवारी झालेली मिरवणूक व कळंगुट येथे गुरूवारी झालेली मिरवणूक पहाटेपर्यंत चालली. तेथे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असले तरी आम्ही पणजीत हे होऊ देणार नाही. पणजीकरांना व येणाऱ्या पर्यटकांना शिमगोत्सवातील संपूर्ण कार्यक्रम तथा रोमटामेळ व चित्ररथ स्पर्धा वेळेत पाहता याव्यात यासाठी आम्ही नियम कडक केले आहेत. जागोजागी आमचे कार्यकर्ते आणि पोलीस उपस्थित राहतील. अकारण वेळकाढू धोरण स्वीकारणाऱ्या पथकांना स्पर्धेतून बाद होण्याची पाळी येऊ शकते. एखादे पथक इतर सर्व पथकांना अडवून ठेवते, असा प्रकार यंदा होऊ देणार नाही असेही मंगलदास नाईक यांनी जाहीर केले.
वेळेचे कडक पालन होणार
दुपारी 2.30 वाजता नोंदणी कार्यालयात जाऊन तिथे नोंदणी सुरू करावी. सायंकाळी 4 वाजता रोमटामेळ सादरीकरणाला प्रारंभ होईल. पथकांनी आझाद मैदानापर्यंत सायंकाळी 6.30 वा. पोहोचले पाहिजे. प्रत्येक पथकाला रिंगण सादर करण्यास 15 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. तिथेच परीक्षण होईल. चित्ररथ स्पर्धेला सायंकाळी 7 वाजता काकुलो चौक येथून प्रारंभ होईल. शेवटचा चित्ररथ हा रात्री 9.30 वाजता आझाद मैदानावर पोहोचणे बंधनकारक केले आहे. पणजीतून शिमगोत्सव स्पर्धेला शिस्तीत प्रारंभ व्हावा. वेळकाढू धोरणामुळे उपस्थितांची धांदल होते त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे मंगलदास नाईक म्हणाले.
म्हापसातील मिरवणूक 10 वाजेपर्यंतच : नाटेकर
दरम्यान, म्हापसा शिमगोत्सव समितीने देखील आम्ही शिमगोत्सवादरम्यान शिस्तीचे कडकपणे पालन करणार आहोत, असे समितीचे अध्यक्ष डॉ. गुरूदास नाटेकर यांनी सांगितले. आम्ही सायंकाळी 5 वा. मिरवणुकीला तथा स्पर्धांना प्रारंभ करणार असून रात्री 10 च्या आत मिरवणुकीचे विसर्जन करणार आहोत. आम्हाला उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावयाचे आहे. वेळेचे बंधन सर्व पथकांना घालण्यात आले आहे. शिस्तपालन समितीची त्यासाठी स्थापना केली असून तिच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक शषांक नार्वेकर यांची नियुक्ती केल्याचे नाटेकर यांनी सांगितले. म्हापसा येथे रविवार दि. 12 मार्च रोजी रोमटामेळ व चित्ररथ स्पर्धांचे आयोजन केले आहे.
अन्यथा कारवाई अटळ : अधीक्षक वाल्सन
शिमगोत्सवातील चित्ररथ मिरवणुका न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेत होणे गरजेचे आहे. अन्यथा कारवाई केली जाईल, अशी माहिती उत्तर गोवा अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली आहे. आवाज प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी उच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम पाळणे पोलीस खात्याला बंधनकारक आहे. त्यामुळे कुणालाही मुभा देता येणार नाही. कार्यक्रमात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि कार्यक्रम वेळेत आटोपते घ्यावे असे आवाहनही वाल्सन यानी केले आहे. उच्च न्यायालयाने कोणत्याही कार्यक्रमाला रात्री 10 वाजेपर्यंत वेळ दिलेली आहे. त्यानंतर होणारे कार्यक्रम बंद पाडण्यात यावे, असा आदेश न्यायालयाने पोलासांना दिला आहे.