रविवारपासून आठ दिवस चालणार इफ्फी : जगभरातील सातशे चित्रपट-लघुपटांचे प्रदर्शन
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. महोत्सवाचा उद्घाटन सोहळा रविवार दि. 20 रोजी सायंकाळी 5 वा. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियवर होणार असून यासाठी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध अभिनेता वरूण धवन, सारा खान, कार्तिक आर्यन, मृणाल ठाकूर, अमृता खानविलकर, कॅथरिन ट्रेसा, आदी सिनेतारकांचा रंगारंग कार्यक्रम उद्घाटन सोहळय़ाला होणार असल्याची माहिती एनएफडीसीचे एमडी व महोत्सव संचालक रवींद्र भाकर यांनी गोवा मनोरंजन सोसायटी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आंचिमचा पडदा डायटर बर्नर दिग्दर्शित ऑस्ट्रियन चित्रपट ‘अल्मा अँड ऑस्कर’ या चित्रपटाने उघडणार आहे तर क्रिस्झटॉफ झानुसीच्या ‘परफेक्ट नंबर’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल. अल्मा अँण्ड ऑस्कर हा चित्रपट रविवार दि. 20 रोजी आयनॉक्स 1 सभागृहात दुपारी 2.30 वा. दाखविण्यात येणार आहे. दि. 28 रोजी दुपारी 2.30 वा. आयनॉक्स स्क्रीन 1 मध्ये ‘परफेक्ट नंबर’ चित्रपट दाखविण्यात येईल. महोत्सवात 23 विविध भाषांमधील 339 चित्रपट तर 24 विविध भाषांमधील 248 लघुपट दाखविण्यात येणार आहेत. तसेच इंडियन पॅनोरमामध्ये एकूण 25 चित्रपट आणि 19 लघुपट दाखविले जातील.
उद्घाटन सोहळय़ात दिग्गजांची उपस्थिती
आंचिमच्या उद्घाटन सोहळय़ात अजय देवगण, सुनील शेट्टी, वरूण धवन, क्रीती सेनन, प्रभूदेवा, मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, शेखर कपूर, राणा डगुबत्ती, मणिरत्नम, ए. आर रेहमान, पंकज त्रिपाठी, परेश रावल यांच्याबरोबर 118 आंतरराष्ट्रीय तर 221 भारतीय चित्रपट कलाकारांची उपस्थिती असणार आहे. उद्घाटन आणि समारोप सोहळय़ाला एकूण 14 सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असेल. ज्यात गोवा, फ्रान्स आणि स्पेन येथील डान्सग्रुप असतील. मागील ‘शंभर वर्षांतील भारतीय चित्रपटांची उत्क्रांती’ ही उद्घाटन सोहळय़ाची थीम असेल.
‘हदिनेलेन्तु’ ने होणार इंडियन पॅनोरमाचे उद्घाटन
इंडियन पॅनोरमा विभागाचे उद्घाटन पृथ्वी कोनानूर्स यांच्या ‘हदिनेलेन्तु’ या कन्नड चित्रपटाने आणि दिव्या कोवास्जी यांच्या ‘शो मस्ट गो ऑन’ या चित्रपटाने होणार आहे. ‘चेलो शो-द लास्ट फिल्म शो’ या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटाचेही प्रदर्शन होणार आहे. याशिवाय 183 चित्रपट हे आंतरराष्ट्रीय प्रोग्रामिंगचा भाग असतील.
अनेक दिग्गज कलाकारांना वाहणार श्रद्धांजली
दादासाहेब फाळके रेट्रोस्पेक्टीव्ह विभागात ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्यावर आधारित असून तिसरी मंजिल, दो बदन, कटी पतंग हे तीन चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. होमेज विभागात 15 भारतीय तर 5 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश असून भारतरत्न लता मंगेशकर, गीतकार बप्पी लाहिरी, कथ्थक मेस्ट्रो पं. बिरजू महाराज, कलाकार रमेश देव, रवी टंडन, केके अशा एकूण 17 कलाकारांना चित्रपटांद्वारे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
मणिपुरी चित्रपटसृष्टीचा सुवर्णमहोत्सव साजरा करणार
ईशान्य भारतातील चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी मणिपुरी चित्रपटसृष्टीचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात 5 फिचर आणि 5 नॉन फिचर चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. एनएफआयतर्फे ‘इंडियन रिस्टोर्ड क्लासिक या विभागातून काही चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
फोकस कंट्रीमध्ये फ्रान्सच्या आठ चित्रपटांचे प्रदर्शन
यंदा फ्रान्स ‘कंट्री फोकस’ असून यात फ्रान्सचे आठ चित्रपट दाखविले जाणार आहेत. इंडियन पॅनोरमा विभागात चेलो शो आणि इंडिया लॉकडाऊन या दोन चित्रपटांचे विशेष स्क्रीनिंग करण्यात येणार आहेत. तसेच इंडियन रिस्टोर्ड क्लासिक विभागात डिजीटली पुनरूज्जीवीत करण्यात आलेल्या पाच क्लासिक चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विभागात एकूण 183 चित्रपट दाखविण्यात येणार असून सिनेमा ऑफ वर्ल्ड विभागात 81 चित्रपट, आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 15, उत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक 7 चित्रपट, आयसीएफटी युनेस्को विभागात 9 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय विभागातील चित्रपट हे महिला फिल्ममेकर्सचे असल्याची माहिती भाकर यांनी दिली.
अनेक चित्रपटांचा होणार प्रिमीयर शो
यंदा महोत्सवासाठी विशेष पॅकेज विभाग तयार करण्यात आला असून यात इंटरग्रेड- प्रयोगात्मक असे 10 चित्रपट, युनिसेफचे 6 चित्रपट, ऍनिमेशन विभागात चार चित्रपट आणि चार हॉरर चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. हिंदी चित्रपटांचे प्रिमीयरही होणार असून यात परेश रावल यांचा ‘द स्टोरी टेलर’, अजय देवगण यांचा ‘दृश्यम 2’, खाकी- द बिहार चॅप्टर, यामी गौतमचा ‘लॉस्ट’, वरूण धवनचा ‘भेडिया’ आदी चित्रपटांचा समावेश आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी व्यासपीठावरील काही चित्रपटांचाही या महोत्सवात प्रिमीयर होईल.
अनेक दिग्गज घेणार मास्टर क्लास
चित्रपटांबरोबर एनएफडीसी आणि सत्यजित रे फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटतर्फे आयोजित केलेल्या प्रख्यात चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांसोबत 23 मास्टरक्लास आणि इन कॉन्व्हर्सेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांचा पटकथा लेखनावर, ए. श्रीकर प्रसाद यांचा संपादनावर आणि अनुपम खेर यांचा अभिनयावर मास्टरक्लास असेल. याचबरोबर आशा पारेख, प्रसून जोशी, आर. बाल्की, नवाजुद्दीन सिद्दीकी, अनिल मेहता, ऑस्कर अकादमी तज्ञ, शेखर कपूर, आर बाल्की, ए आर रहमान, नवाजुद्दीन सिद्दीकी यांचीही सत्रे असणार आहेत.
75 क्रिएटिव्ह माईंडस् ऑफ टूमारो यात शॉर्ट्स टीव्ही युके येथील कंपनी प्रोग्रामिंग भागीदार असल्याने 75 क्रिएटिव्ह माईंडस्ना 53 तासांचे आव्हान हा उपक्रम करण्यात येणार असून यात त्यांना 53 तासात लघुपट बनविण्याचे आव्हान देण्यात येणार आहे. यातील विजेते चित्रपट शॉर्ट्स टीव्हीवर दाखविले जातील. सत्यजित रे यांच्यावर आधारित पोस्टर स्पर्धेत विजेत्यांचे पोस्टर फेस्टिव्हल माईल येथे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. याशिवाय 75 पोस्टरही प्रदर्शित करण्यात येणार आहेत. इफ्फी माईल येथे 24 स्थळे सेल्फी पॉईंट्ससहित निश्चित करण्यात आली आहेत.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे गाला प्रिमीयर, सत्यजित रे प्रदर्शन असेल. याशिवाय फिल्म बाजार येथे विविध देशातील आणि राज्यातील पवेलियन्स उभारण्यात येणार आहेत. याशिवाय चित्रपटसृष्टीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ‘टेक’ प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. फिल्म बाजार समारोप दि. 24 रोजी होणार असून रघु दीक्षित यांच्या कार्यक्रमाने फिल्म बाजाराची सांगता होईल, अशी माहिती रवींद्र भाकर यांनी यावेळी दिली.
सहा हजार प्रतिनिधींची नोंदणी, संख्या अजून वाढणार
पणजीत मनोरंजन झोन, आर्ट पार्क, सेल्फी पॉईंट्स उभारण्यात आले आहेत. याशिवाय थेट प्रक्षेपण कार्यक्रम होतील. पणजीत व रवींद्र भवन मडगाव येथे ओपन एअर स्क्रीनिंग करण्यात येणार असल्याची माहिती गोवा मनोरंजन सोसाटीच्या सीईओ स्वीतिका सचन यांनी दिली. आतापर्यंत महोत्सवासाठी 5949 प्रतिनिधींची नोंद झाली असून हा आकडा 7000 पर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता सचन यांनी यावेळी व्यक्त केली.
गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी विशेष मास्टर क्लास
गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी दि. 23 ते दि. 26 रोजीपर्यंत ताज विवांता येथे मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातील गोमंतकीय विभागात ‘अर्दो दिस’, ‘बिफोर आय स्लीप’,‘निमण्या दिसाक’, ‘विन्ड चाईम्स’,‘ द व्हाईट ड्रीम’, ‘द व्हाईट शर्ट’, हे सहा लघुपट तर ‘गोंयमुक्तीचे होमखण’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
देश-विदेशी पाहुण्यांसाठी खास शिमगो, कार्निव्हल
आझादी का अमृतमहोत्सवअंतर्गत दि. 26 रोजी शिमगोत्सव आणि दि. 27 रोजी कार्निव्हलवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून सदर प्रदर्शन महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरेल.