धामणे (एस) येथे ऊस पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान : भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
धामणे (एस) येथे हत्तींचा धुमाकूळ सुरूच आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान वनखात्यामार्फत नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून भरपाईसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी या भागात वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
मागील आठवड्यापासून हत्तीच्या कळपाने या भागात हैदोस घातला आहे. त्यामुळे भात, ऊस, रताळी व इतर पिकांचे नुकसान होत आहे. दरम्यान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी लावून धरली होती. वन खात्याने आता नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा सुरू केला आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी ऑनलाईन अर्ज भरणेही सुरू केले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.
चोहोबाजूने चंदगड तालुक्याने वेढलेल्या धामणे (एस) गावाकडे दुर्लक्ष झाल्याने प्राथमिक सुविधाही मिळत नसल्याने समस्यांना तोंड द्यावे लागते. पाणी, विद्युत, वैद्यकीय, शिक्षण आदी सुविधा गावकऱ्यांना म्हणाव्या तशा मिळत नाहीत. त्यातच पिकांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान होत आहे. वर्षभर राबून घेतलेल्या पिकात वन्य प्राणी हैदोस घालत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. दरवर्षी पाऊस कमी झाल्यानंतर प्राण्यांकडून नुकसान सुरूच असते. त्यामुळे शेती कशी करावी असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडला आहे. बटाटा, रताळी, भुईमूग, सुगी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. दुसरीकडे वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. धामणे येथील सुरेश गावडू पाटील, गावडू गोविंद पाटील, लक्ष्मण पाटील, लक्ष्मण बुक्क्याळकर, रामचंद्र भरमा हाजगोळकर, प्रकाश रामचंद्र हाजगोळकर, धाकलू जानू वाडेकर या शेतकऱ्यांच्या उसाचे हत्तींनी नुकसान केले आहे. नुकसानग्रस्त पिकाची वनाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यामुळे भविष्यात या शेतकऱ्यांना खरोखरच भरपाई मिळणार का? आणि मिळाली तर किती मिळणार? हे आता पहावे लागणार आहे.
वन्य प्राण्याकडून पिके फस्त
दरवर्षी हत्तींकडून पिकांचे नुकसान होते. हातातोंडाला आलेली पिके वन्य प्राणी फस्त करतात. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आहे. आणि ऑनलाईन अर्ज करून घेतला आहे.
– गावडू पाटील (शेतकरी धामणे)