पुरंदावडेत माऊलीचा रिंगण साेहळा उत्साहात : लाखाे वैष्णवांनी अनुभवला दाेन वर्षांनंतर रिंगण साेहळा
नंदकुमार साळुंखे /पुरंदावडे
टाळ मृदंगाचा ध्वनी।
गेले आसमंत व्यापुनी।
नभ आले भरुनी।
अश्व दाैडले रिंगणी।।
आसमंत व्यापून टाकणारा चैतन्य स्वरुप टाळमृदंगाचा नाद व त्यातुन निर्माण होणारे माऊली माऊली नामाचे नादब्रह्म या सर्वांचा संगम म्हणजे रिंगण हाेय. काेराेना नंतर दाेन वर्षांनी पुरंदावडे येथील माऊलींच्या पालखी साेहळ्यातील पहिला गाेल रिंगण साेहळा लाखाे वैष्णवाच्या उपस्थितीत संपन्न झाला.
माऊलींच्या पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या पद्धतीने माऊलींची पूजा बांधली जाते. रिंगण सोहळा ही एक पूजा आहे. समाजातील सर्व थरातील लोक एकत्र येऊन ही विश्व माऊलींची पूजा बांधतात. टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष सुरू असतानाच अश्वांचचे रिंगण सुरू होते व या रिंगणाच्या माध्यमातून माऊलींचे विश्वरूप दर्शन वारकऱ्यांना होते. पुरंदावडे येथील हा नेत्रदीपक रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी लाखो भाविक उपस्थित झाले होते.
आकाशात ढगांनी गर्दी केली होती. कधी पाऊस कोसळेल याचा नेम नव्हता. पावने चार दरम्यान रिंगण सोहळ्यास सुरूवात झाली. विविध दिंडींच्या ध्वजाने रिंगणाला प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर चोपदारांनी माऊली व स्वाराच्या अश्वांना रिंगणासाठी सोडले. सुरूवातीला स्वाराच्या अश्वाने व माऊलींच्या अश्वाने नेत्रदीपक दौड करीत प्रदक्षिणा पूर्ण केली. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी माऊलीऽऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करून वैष्णवांनी माऊलीच्या घाेड्याच्या टापाखालील माती भाऴी लावण्यासाठी एकच गर्दी केली हाेती.
अन् सुरु झाला उड्या खेळ
रिंगण सोहळ्यानंतर दिंड्यांमधून हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी हे मैदानी खेळ रंगले. त्यानंतर चोपदारांनी उडीच्या कार्यक्रमासाठी दिंड्यांना निमंत्रित केले. माऊलींना मध्यभागी घेवून या दिंड्यांमध्ये टाळ, मृदुंगाच्या साथीन आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्मचा उडीचा खेळ रंगला. सर्व वारकरी श्वास रोखून या नादब्रह्मात तल्लीन होऊन गेले होते.