न्यायालयाच्या आदेशामुळे आम्ही असमर्थ, विद्यार्थ्यांची निराशा
प्रतिनिधी /बेळगाव
पंडित नेहरु महाविद्यालयातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या प्राध्यापकांना कमी करून त्या ठिकाणी शिक्षण विभागाने नूतन प्राध्यापिकांची निवड केली. मात्र या प्राध्यापिकांनी शिकवलेले आम्हाला समजत नाही. त्यामुळे आम्हाला पूर्वीच्याच प्राध्यापक पाहिजे म्हणून पंडीत नेहरु पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली होती. त्यानंतर पुन्हा सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन आम्हाला त्याच शिक्षक हव्यात, असे सांगितले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाने आदेश दिल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
पंडित नेहरु विद्यालयामधील कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने त्या प्राध्यापिका काम करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला त्यांनी शिकविले आहे. त्यामुळे आम्हाला त्यांनी शिकवलेला अभ्यासक्रम समजत होता. मात्र अचानकपणे त्यांना कमी करून नवीन प्राध्यापकांना नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी शिकविलेले आम्हाला काहीही समजत नाही. त्यामुळे आम्हाला पूर्वीच्याच प्राध्यापक हव्यात, असे त्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र न्यायालयामध्ये प्रकरण होते. न्यायालयानेच त्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन असो किंवा शिक्षण विभाग असो त्यांना काहीही करू शकत नाही. तेंव्हा तुम्ही
कॉलेजकडे परता, असे त्यांनी सांगितले. नाहक उन्हामध्ये शिक्षण सोडून तुम्ही या ठिकाणी येवू नका, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. निवेदन देण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.