Tarun Bharat

पांडुरंग राऊत यांचे निधन

Advertisements

राऊतांचे गोव्यासाठीचे योगदान कायम स्मरणात : डिचोली मतदारसंघातून बनले दोनदा आमदार,मंत्री म्हणून डिचोलीसह राज्यासाठी मोठे योगदान,कला-संस्कृती, शिक्षण, सहकारातही उल्लेखनीय कार्य

प्रतिनिधी /डिचोली, म्हापसा

 डिचोलीचे माजी आमदार तथा माजी वाहतूकमंत्री पांडुरंग राऊत यांचे काल सोमवारी पहाटे वयाच्या 76 व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे मूळ गाव साळ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक पुत्र, तीन कन्या आदी परिवार आहे.

राऊत यांच्या निधनाचे वृत्त समजताच मान्यवर, त्यांचे हितचिंतक तसेच सर्व थरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते यांनी म्हापशातील निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही राऊत यांच्या निवासस्थानी भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर साळ येथे नेऊन त्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

राऊतांचे गोव्यासाठीचे योगदान कायम स्मरणात

मुख्यमंत्री म्हणाले की, राऊत यांनी गोव्याच्या विकासासाठी दिलेले योगदान गोमंतकीय जनता कायम स्मरणात ठेवील. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहे.

राऊत यांच्या निधनाबाबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े, माजी आमदार राजेश पाटणेकर, माजी आमदार नरेश सावळ आदींनी तसेच काँग्रेस पक्षानेही दुःख व्यक्त केले आहे.

डिचोलीसह राज्यासाठी मोठे योगदान

डिचोली तसेच राज्याच्या विकासासाठी राऊत यांनी अनेक प्रकल्प राबवले. डिचोली  बायपास, कदंब स्थानक, उपअधीक्षक कार्यालय, वाहतूक कार्यालय त्यांनी आणले. डिचोली शहराचा मास्टर प्लान त्यांनीच आखला होता. शिमगोत्सव शासकीय पातळीवर संपूर्ण राज्यभर व्हावा यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. साळ व मुळगाव या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक विद्यालय तसेच उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करून शिक्षण क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले.

राऊत रोडवेजची केली स्थापना

 पांडुरंग राऊत यांचा जन्म 1946 साली साळ या डिचोली तालुक्मयातील खेडेगावात झाला. सुरुवातीला त्यांनी घाटगे पाटील या माल वाहतूक कंपनीमध्ये नोकरी केली. तेथूनच अनुभव घेत त्यांनी राऊत रोडवेज ही स्वतःची माल वाहतूक कंपनी स्थापन केली.

डिचोली मतदारसंघातून बनले आमदार

अत्यंत शांत व मृदुभाषी असा त्यांचा स्वभाव होता. डिचोली मतदारसंघात बहुसंख्येने असलेला व सर्व गावांमध्ये पसरलेल्या मराठा समाजाची ताकद त्यांना माहीत होती. समाजकारण व राजकारणाचा फारसा अनुभव नसताना त्यांनी राजकारणात मोठी झेप घेतली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर 1989 साली गोवा विधानसभेची निवडणूक त्यांनी डिचोली मतदारसंघातून लढवली आणि विजयी झाले.

अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले

1989 च्या या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 18 जागा मिळाल्या. 1991 साली ते कॅबिनेट मंत्री झाले. कॅबिनेट मंत्री असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. एप्रिल 1994 पर्यंत ते कॅबिनेट मंत्री होते.

लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार

त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना 1998 च्या लोकसभेसाठी उत्तर गोव्याची उमेदवारी दिली. फक्त चार आमदार असणाऱया भाजपने त्यावेळी लोकसभेची ही जागा फक्त 425 मतानी गमावली होती. त्याचबरोबर दक्षिण गोव्याची जागा अवघ्या 2500 मतांनी गेली. पण संपूर्ण देशाने त्यावेळी गोव्यातील भाजपची नोंद घेतली होती.

राऊत पुन्हा एकदा 1999 साली गोवा विधानसभेवर निवडून आले. 1999 ते 2000 या काळात ते मंत्री तसेच सरकारच्या विविध समित्यांचे सदस्य होते.

सहकार क्षेत्रातही दिले योगदान

गोवा राज्य सहकारी बँकवर भाजपाच्या पॅनलमधून ते निवडूनही आले होते. करासवाडा येथे औद्योगिक वसाहतीजवळ ‘कल्पतरु’ बंगल्यात ते राहत असत. ट्रान्सपोर्ट व्यवसायात असलेले राऊत म्हापसा रोटरी क्लब तसेच सामाजिक संघटनांकडेही संबंधित होते. त्यांच्या वाहतूक व्यवसायाचे पणजीत कार्यालय होते.

राऊतांचे मगोसाठी मोठे कार्य : मंत्री ढवळीकर

‘महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे माजी अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी पक्षासाठी दिलेले योगदान, कार्य विसरता येणार नाही. शांत आणि संयमी नेता अशी ख्याती असलेल्या या नेत्याच्या निधनाने आपल्याला व मगो पक्षाला तीव्र दुःख झालेले आहे’ अशा शब्दात वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. राऊत यांनी अनेक वर्षे मगो पक्षात राहून पक्षासाठी खूप चांगले काम केले व संघटन वाढिसाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर मराठा समाज आणि मराठीसाठीच्या कट्टर अभिमानी व कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेले कार्य सदाच स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मगो पक्षाचे गोव्यातील तमाम कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत आहेत, असेही ढवळीकर म्हणाले.

मार्गदर्शक-आधार हरपला : आमदार शेटय़े

राऊत हे माझ्यासाठी आदरणीय होते. त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा दिली. सहकार, कला संस्कृती, पर्यटन, उद्योग्य, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. प्रेमळ व दिलदार अशी त्यांची व्यक्तिरेखा होती. त्यांच्या जाण्याने एक उत्तम मार्गदर्शक व आधार हरपल्याची भावना डिचोलीचे आमदार डॉ चंद्रकांत शेटय़े यांनी व्यक्त केली.

राज्यपातळीवर शिमगोत्सव सुरु केला : पाटणेकर

माजी सभापती राजेश पाटणेकर यांनी, भाई राऊत ही व्यक्ती खूप दिलखुलास प्रेमळ होती, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. त्यांचे कार्य आपण जवळून पाहिले असून अनेक क्षेत्रांत त्यांनी योगदान देताना ग्रामीण भागात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध केली. राज्य पातळीवर शिमगोत्सव त्यांनीच सुरु केला. त्यांच्या निधनाने एक परिपूर्ण बुजुर्ग राजकीय मार्गदर्शक व नेता गोव्याने गमावल्याची खंत व्यक्त केली.

काँग्रेस पदाधिकाऱयांकडून शोक व्यक्त

 विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्ष अमित पाटकर, काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप नाईक यांनी माजी मंत्री पांडुरंग राऊत यांच्या निधनाबद्दल त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांकडे संवेदना व शोक व्यक्त केला.

Related Stories

एक नवीन जन्म घेतलेली व्यक्ती म्हणून उदयास

Patil_p

माशेल येथील वारकऱयांचे ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ पायी वारीला प्रारंभ

Amit Kulkarni

विरोधकांना राज्यपाल जवळचे !

Patil_p

पंतप्रधानांच्या स्वप्नपूर्तीसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे

Amit Kulkarni

मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी पालक, शिक्षकांनी पुढाकार घ्यावा

Amit Kulkarni

भाटलेत रंगली अ.गो. घुमट आरती स्पर्धा

Amit Kulkarni
error: Content is protected !!